भगरीतून ३० जणांना विषबाधा

1 min read

भगरीतून ३० जणांना विषबाधा

कृष्ण जन्माष्टमीचा उपवास

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भाविकांनी उपवास ठेवला होता.याच उपवासाच्या  भगरीतून 30 जणांना  विषबाधा झाल्याची घटना समोर आली  आहे . सगळ्या रुग्णांवर उपचार सुरु असुन सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.
कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने  उपवासासाठी  लोकांनी गावातील दुकानातुन भगरीचे पीठ आणून,  त्याच्या भाकरी करुन खाल्या.या भगरीच्या भाकरी  खाल्यानंतर अनेकांना उलट्या मळमळ  होऊ लागल्याने गावातील नागरीकांनी मिळेल त्या वाहनाने सोनपेठ येथील डॉ चव्हाण यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. डॉ चव्हाण यांनी तातडीने सगळ्या रुग्णांची पाहणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केले. सोनपेठ येथी 23 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यातील वीस रुग्णांना औषधोपचार करुन घरी पाठवले तर तीन रुग्णांना अस्वस्थ वाटत असल्याने दवाखान्यात भरती करण्यात आले. इतर सात जणांनी गावातच उपचार घेतल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
ह्या घटनेची माहिती कळताच  सोनपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाणे, गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी चव्हाण यांच्या दवाखान्यात धाव घेतली .या वेळी पोलीस जमादार आडे व भिसे यांनी प्रकरणाची माहिती घेतली. कोरोनाचे रुग्ण तालुक्यात वाढत असतांना विषबाधेच्या  घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.