भावकीची मारहाण, पोलीसांचे दुर्लक्ष वृध्दाने केली आत्महत्या

1 min read

भावकीची मारहाण, पोलीसांचे दुर्लक्ष वृध्दाने केली आत्महत्या

भावकीकडून सतत होत असलेली मारहाण आणि अपमान आणि त्याकडे तक्रार करूनही पोलीसांचे होणारे दुर्लक्ष यातून एका वृध्दाने आत्महत्या केली पोलीसांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: तालुक्यातील आहेरवाडी येथे एका ६० वर्षीय इसमाने भावकिच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आहेरवाडी येथे घडली. भावकीच्या मारहाणीची तक्रार देऊनही पोलीसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतली नसल्याने ही आत्महत्या घडल्याचा आरोप मयताच्या मुलाने केला आहे.
आपल्या वडीलांना भावकीतली मंडळी मारहाण करत असताना आपण पोलीस ठाण्यात कळवले मात्र पोलीस घटनास्थळी वेळेत न पोहचल्याने पित्याने आत्महत् केली.याला जबाबदार असणारे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमेसह ठाणे अंमलदार,बिट जमादार यांना जबाबदार धरून निलंबित करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार ग्यानोजी एकनाथ परबते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील एकनाथ ग्यानोजी परबते वय ६० वर्षे रा.आहेरवाडी ता.पुर्णा यांनी दि.९ ऑगस्ट रोजी भावकीच्या लोकांकडून सततची मारहाण व छळास कंटाळून आत्महत्या केली होती. वडीलांच्या आत्महत्येपुर्वी भावकीच्या लोकांनी माझ्या वडीलांना व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली. आम्हाला मारहाण होत असताना गावातील पोलिस पाटलांनी मध्यस्थी करत हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण चिघळत नव्हतं तेव्हा पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे व बीट जमादार मनोज नळगीरकर यांना घडलेल्या घटनेची माहिती फोनवरून दिली. त्या दोघांनी गाडी पाठवतो असे सांगितले. पोलिसांची गाडी घटनास्थळी उशिरापर्यंत आली नसल्याने, पोलिस कंट्रोल विभागास घटना कळवली. भावकीच्या चार ते पाच जणांकडून पुन्हा माझ्यासह परिवारातील सदस्यांना मारहाण होत असल्याने पुर्णा पोलिस ठाणे गाठून घडलेली माहिती ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार बंडु कदम व दिलीप राठोड यांना दिली.
त्या दोघांनी आमची तक्रार न घेता मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून रोजचीच काय कटकट लावली. असे म्हणत जास्त मार लागल्यावर ये असे म्हणून मला पोलिस स्टेशन मधून हाकलून दिले. यानंतर माझे नातेवाईक तथा शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते यांना ही घटना कळवली. त्यांनी याबाबत पो.नि.भुमे यांच्याकडे माझ्यासाठी दाद मागितली परंतू, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पुन्हा पुर्णा पोलिस ठाण्यात पुन्हा गेलो असता. गुन्हा नोंद न करता केवळ एन.सी दाखल करुन घेतली व मला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. याप्रकरणानंतर मी घरी गेलो असता माझे वडील एकनाथ परबते यांनी घरात विद्युत वायरने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिस घटनास्थळी उशिरा दाखल झाले.
त्यांनी पंचनामा केला. त्यांच्या डायरीत लिहुन ठेवलेली सुसाईड नोटही पोलिसांनी जप्त केली. यावेळी माझा जबाब न घेता याप्रकरणी तब्बल 5 दिवसानंतर बगल देत आरोपी चांदु प्रल्हाद परबते, संजय अशोक परबते, अशोक ग्यानोजी परबते चौघे आहेरवाडी येथील रहिवासी व सिध्दार्थ प्रल्हाद परबते रा.लालवाडी नांदेड या चार आरोपीविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात आज गुरुवार नं.२५८/२०२० कलम ३०६,३५४,३२४,३२३, २९४,४२७,५०४,५०६,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वेळेत सतर्कता बाळगत घटनास्थळी मदत केली असती.तर माझ्या वडीलांचा जीव गेला नसता. या मारहाणीच्या घटनेबाबत भावकीच्या लोकांबरोबर घटनास्थळी वेळेत पोहचण्यासाठी टाळाटाळ करणारे पोलिसही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार ग्यानोजी परबते यांनी बुधवारी दि.१९ ऑगस्ट रोजी पुर्णा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांच्याकडे केली आहे.