राज्य सरकारसह अनिल देशमुखांना मोठा झटका

गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना मोठा झटका

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी देशमुखांनी केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. तर अनिल देशमुख प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात राज्य सरकारला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.

सुप्रीम कोर्टात अपिल करता येईपर्यंत सीबीआयला कागदपत्रांची मागणी करण्यापासून थांबवता येईल का? सीबीआयला त्यांची हमी काही दिवस कायम ठेवण्याचे निर्देश देता येतील का? अशी विनंती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी केली असता त्याला सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यावेळी रात्रीच्या वेळी सुनावणी होत होती, हे लक्षात घेऊन सीबीआयतर्फे हमी देण्यात आली होती, असे तुषार मेहता यांनी नमूद केले. त्यामुळे रफिक दादा यांनी या निर्णयाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती द्यावी, अशी विनंती राज्य सरकारतर्फे केली. या विनंतीलाही मेहता यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची ही विनंतीही फेटाळली. याचिका कारणांसह फेटाळली असल्याने ही विनंतीही मान्य करण्याचेही कोणते कारण दिसत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने विनंती फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारची स्थगितीची विनंती मान्य केली तर तपासात हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे राज्य सरकारची तोंडी विनंतीही फेटाळण्यात येत आहे, असे खंडपीठाने नमूद केले.

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना प्रतिमहिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत तपास सुरु आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.