नाशिक: महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते वसंत गिते व सुनील बागुल यांनी स्वगृही परत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळणार आहे. दरम्यान आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गिते व बागुल त्यांच्या हाती शिवबंधन बांधणार आहे. या दोघांच्या प्रवेशामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच वसंत गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना 'मिसळ पार्टी' आयोजित करून मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दोन दिवसांपूर्वी गिते आणि बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. अखेर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.