विजय कुलकर्णी/ परभणी : गेल्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यात 'बर्ड फ्ल्यू'ने थैमान घातले आहे. ज्यामुळे चिकन आणि अंड्यांचे भाव गडगडले आहेत. मात्र, दुसरीकडे मटन आणि मच्छीचा देखील भाव वाढला नसल्याचे दिसत आहे.
अंडी-चिकनचे भाव कोसळले
एरवी १८० रुपये किलो दराने विक्री होणारे चिकन बर्ड फ्ल्यू मुळे सध्या १२० ते १४० रुपये दराने विक्री होत असल्याचे येथील चिकन मार्केटमध्ये दिसून आले. त्याप्रमाणे अंड्यांचे भाव देखील पडले असून, एरवी १८० रुपयांना विक्री होणाऱ्या अंड्यांच्या एका खिस्तीचा भाव ५० रुपयाने पडून तो १३० रुपये एवढा झाला असल्याची माहिती चिकन व अंडे विक्रेते यांनी दिली.
मटनाच्या भावात फरक नाही
एकीकडे चिकन आणि अंड्यांचे भाव पडले असले, तरी दुसरीकडे मटणाचे भाव मात्र वधारलेले दिसून येत नाहीत. कारण बर्डफ्ल्यूमुळे अनेकांची मास-मच्छीवरची भावनाच उडाल्याचे दिसून येत आहे. परिणामी मटण मार्केटमध्ये ग्राहक फारसे येताना दिसत नाहीत. एरवी ६०० रुपये किलो दराने विक्री होणारे मटण आता सुद्धा ६०० रुपये दरानेच विकत असल्याची माहिती मटण विक्रेत्यांनी दिली.
मच्छी मार्केटचीही तीच परिस्थिती
दरम्यान मटण मार्केटप्रमाणे मच्छी मार्केटमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. एकीकडे बर्डफ्ल्यूमुळे चिकनची विक्री कमी झाल्याने मटन आणि मच्छीला भाव येतील, अशी धारणा होती. मात्र, प्रत्यक्षात असा काहीही फरक पडलेला नाही. मच्छीचे भाव पूर्वी प्रमाणेच असल्याचे दिसून येते. एरवी १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री होणारी मच्छी सध्या त्याच भावाने विक्री होत आहे. तर, कतला आणि इतर महाग समजले जाणारे मासे ४०० रुपये पर्यंत विक्री होत असल्याचे मच्छी विक्रेते सांगत आहेत.
अमावस्या आणि संक्रांतीचा परिणाम
सध्या बर्डफ्ल्यूचे संकट असले तरी नेहमीच अमावस्या आणि सणावराच्या दिवसांमध्ये मास-मच्छीची विक्री कमी प्रमाणात होत असते. तशीच परिस्थिती यावेळी देखील दिसून येते. गेल्या काही दिवसात बर्डफ्ल्यूमुळे चिकन व अंड्यांची विक्री कमी झाली आहे. मात्र, सध्या अमावस्या आणि दोन दिवसांवर संक्रांत असल्याने मटण आणि मच्छीविक्री देखील घटल्याचे या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे, भाव कमी-जास्त न होता ते स्थिर असल्याचे जाणवले.