भाजपा विजयाचे समिकरण मांडणार का?

1 min read

भाजपा विजयाचे समिकरण मांडणार का?

मराठवाडा पदविधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने एनालायजरने केलेला अभ्यास आणि निष्कर्ष तपशीलवारपणे मांडत आहोत. प्रमुख पक्ष आणि संभाव्य उमेदवार यांच्या बलस्थानांचा विचार करत हा अभ्यास आहे. आज पासून ही मालिका सुरू करत आहोत.

विकेट पडत नसेल तर बॉलर बदलण्याचा साधा नियम क्रिकेट मध्ये वापरला जातो. असाच नियम राजकीय क्षेत्राला देखील लागू पडतो. एखादा विषय, पध्दत किंवा व्यक्ती यश मिळवून देत नसेल तर ते देखील बदलावे लागते.

मराठवाडा पदविधर मतदारसंघात भाजपाच्या बाबतीत असेच घडत आहे. यश मिळणे कठीण होत असताना आता धोरण व्यक्ती पध्दत बदललण्याची वेळ आली आहे.मागच्या २४ वर्षातील या मतदारसंघाचा इतिहास पाहता एक वेळा विजय तर तीन वेळा पराभव अशी भाजपची स्थिती राहिली आहे. त्या आधी जयसिंगराव गायकवाड यांच्या रूपाने भाजपाला विजय मिळाला होता. तर एक वेळा श्रीकांत जोशी विजयी झाले होते. श्रीकांत जोशी यांना पराभव स्विकारावा लागला त्यानंतर मात्र दोन्ही वेळा सतिश चव्हाण विजयी झाले आहेत.श्रीकांत जोशी यांचा विजय देखील अगदी निसटता असा होता. तर पराभव मात्र भरघोस मतांनी झाला.

मोदी लाटेत देखील पराभव

मोदी लाट असतानाही भाजपला २०१४ साली ही जागा राखता आली नव्हती. त्यावेळी भाजपचे उमेदवाराचा पराभव हा अगदीच विचार करायला लावणारा होता.देशात मोदी लाट होती. केंद्रात स्पष्ट बहुमताने सरकार आले होते. त्याचवेळी ३ जुनला गोपिनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याने एक सहानुभुतीची लाट होती. राज्याच भाजपची सत्ता येणार अशी स्थिती होती. तरीही भाजप उमेदवाराचा पराभव झाला.हा पराभव साधा अथवा निसटता असा नव्हता तर भाजपचा उमेदवार अगदी पहिल्याच फेरीत गारद झाला होता. अशी पहिल्याच फेरीत पराभुत होण्याची वेळ या आधी कधीच आलेली नव्हती. सगळी परिस्थीती अनुकुल असताना हे घडत असेल तर आता पूर्वीसारखी स्थिती नाही.आणि राज्याच सत्ता नसताना त्याच फॉर्म्युल्यावर विजय मिळू शकेल ही शक्यताच मुळात धुसर होते.

या मतदारसंघाची व्याप्ती आणि स्थिती पाहता केवळ पक्ष आणि संघ परीवार याच्या आधारावर विजय मिळू शकेल अशी स्थिती नाही.शिक्षक मतदारसंघात तो अनुभव पक्षाने घेतला आहे. या मतदारसंघात यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षातील मते घेण्याची गरज असते. विद्यमान आमदाराच्या नाराजीचा फायदा उचलू शकेल असा उमेदवार भाजपाला शोधणे आवश्यक तर आहेच पण त्यासोबत विरोधी पक्षातील नाराज मंडळीची मते खेचून घेण्याची शक्ती असलेला उमेदवार असणे आवश्यक आहे.

पक्षाबाहेरचा नको बाहेरची मते घेणारा पक्षातील असावा

अशी स्थिती आली की सरळ एखाद्या पक्षाबाहेरच्या व्यक्तीला पक्षात घेऊन त्याला उमेदवारी देण्याचा एक सरधोपट विचार केला जातो. पक्षाबाहेरचा उमेदवार घेण्याऐवजी सर्वपक्षीय संबध सौहार्दाचे असलेला बाहेरच्या मंडळींची मते घेऊ शकेल असा उमेदवार शोधणे आवश्यक आहे. तरच भाजपा या निवडणुकीत विजयाच्या समीप जाऊ शकतो. औरंगाबादची मतदार संख्या पाहता उमेदवार औरंगाबादचा असावा असा प्रघात आहे पण तसे असतानाही त्याचा अन्य जिल्ह्याशी संपर्क असायला हवा. खास करून लातूर उस्मानाबादशी संबध असावेत.हे यासाठी की विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांचा प्रभाव या दोनच जिल्ह्यात आहे.

पदविधरच्या निवडणुकीत जातीय समिकरणे काम करत आहेत हे खेदाने नमुद करावे लागेल. मुळातच राजकारणाचा स्तर आता वेगळ्याच पातळीवर जात आहे. राजकीय विरोध अथवा मतभिन्नता ही व्यक्तीगत द्वेषाच्या पातळीवर कधीच जात नव्हती. आता मात्र मतभिन्नता आता राजकीय विरोधाची जागा ही व्यक्तीगत आकसाने घेतली आहे. व्यक्तीगत आकस आणि राग निवडणुकांच्या मध्ये जातीय अथवा धार्मिक रंग भरू लागले आहेत. म्हणूनच विजयासाठी जातीय समिकरणांचा विचार देखील होऊ लागला आहे. एखादा उमेदवार कोणत्या कोणत्या समुहाची मते खेचू शकेल याचा विचार देखील होऊ लागला आहे. भारतीय जनाता पक्षाला या समिकरणाचा देखील विचार करावा लागणार आहे.

समोरचा उमेदवार कोण याचा देखील विचार विजयाच्या गणितात करावा लागतो. सरावलेला आणि पूर्ण तयारीचा उमेदवार असेल तर त्याच्या समोर तितक्याच ताकदीचा उमेदवार उभा करण्याची गरज असते. राष्ट्रवादीचा उमेदवार संपूर्ण ताकदीचा असेल आणि शिवसेनेच्या रूपाने त्याची ताकद अधिक वाढणार असेल तर तेवढाच तुल्यबळ राजकीय भाषेत टफ फाईट देऊ शकणारा उमेदवार भाजपने देणे आवश्यक आहे. तर आणि तरच ही निवडणुक भाजप लढतेय असा संदेश जाईल अन्यथा ही निवडणुक लुटूपूटूची असल्याचा भास मतदारात निर्माण होईल आणि विद्यमान व्यवस्थेला पर्याय म्हणून तो कोणाचाच विचार करणार नाही याची गांभिर्याने नोंद भाजपच्या वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.

सर्वमान्यता देखील हवी

मराठववाड्यात भाजप वाढवविणारे अनेक नेते आहेत.औरंगाबादेत हरीभाऊ बागडे, बीडमध्ये पंकजा मुंडे, जालण्यात बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे, लातूर मध्ये संभाजी पाटील निलंगेकर,उस्मानाबादमध्ये सुजितसिंह ठाकूर यांच्या मतांचा विचार देखील होणे आवश्यक आहे. पक्षादेश म्हणून सगळे कामाला लागतील पण ते मनातून काम करतील का याचा विचारर करण्याची गरज देखील आहे. पक्षाने उमेदवार लादण्यापेक्षा तो सर्वमान्यतेने किमानपक्षी बहुसंख्य लोकांच्या संमतीने देणे आवश्यक आहे.

या निवडणुकीत भाजपला यश मिळावयचे असेल तर नेते याचा विचार नक्की करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही