भाजपचे झुणका भाकर आंदोलन

1 min read

भाजपचे झुणका भाकर आंदोलन

गोड दिवाळी कडू करणार्‍या शासनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झुणका भाकर खाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

विजय कुलकर्णी/परभणी: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा करुन आर्थिक मदत करु, अशी घोषणा राज्य सरकारद्वारे करण्यात आली परंतु, प्रत्यक्षात दिवाळी आली तरीही, शेतकर्‍यांच्या खात्यात दमडीही जमा झाली नाही. गोड दिवाळी कडू करणार्‍या शासनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, किसान मोर्चाच्या वतीने शुक्रवारी दि.१३ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झुणका भाकर खाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, प्रमोद वाकोडकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उध्दवराव नाईक, बाळासाहेब भालेराव, सुभाष आंबट, रंगनाथराव सोळंके, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, बाळासाहेब जाधव, गोपाळराव डुकरे, सुरेश भुमरे, अ‍ॅड. तांदळे, राजेश देशमुख, माधव चव्हाण, अरुण गवळी, सुभाष गव्हाणे, बालाजी राऊत, राजेभाऊ शिंदे, दत्तराव मुळे, नवनाथ वाघ, आकाश लोहट, प्रभाकर शिंदे, प्रताप सुक्रे आदींची उपस्थिती होती.

यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, उडीद व कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाभरात दौरे करुन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याबाबत निवेदने देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व शेकर्‍यांना सरसकट आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. शासनाने जिल्ह्यातील १६ मंडळांना मदतीपासून वंचित ठेवले. या संवेदनाहीन सरकारला शेतकर्‍यांच्या परिस्थिची जाणीव नसल्याचा आरोप यावेळी पदाधिकार्‍यांनी केला.

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करु, अशी घोषणा सरकारद्वारे करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात दिवाळी आली, तरीही शेतकर्‍यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा झाली नाही. शासनाच्या आर्थिक मदतीची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झाली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झुणका भाकर खाऊन धरणे आंदोलन केले.