बलात्काराचा सलेक्टीव्ह निषेध

1 min read

बलात्काराचा सलेक्टीव्ह निषेध

उत्तरप्रदेशात बलात्कार झाला त्याचा निषेध न्यायसंगतच आहे. पण त्याचा राजकीय वापर होत असताना महाराष्ट्रातील परिस्थिती देखील तपासायला हवी आणि त्याचाही तेव्हढाच निषेध व्हायला हवा.

उत्तर प्रदेशातील एका गावात तरूणीवर बलात्कार आणि विटंबना असा प्रकार घडल्यानंतर ती दलीत तरूणी आणि भाजप शासीत राज्य असल्याने सलेक्टीव्ह गोंधळाला सुरूवात झाली. त्या तरूणीवर बलात्कार झाला नाही असा वैद्यकीय अहवाल आला आणि त्याच्या बातम्या प्रकाशीत झाल्यावर हा अहवाल देखील मॅनेज असल्याचा डांगोरा पिटल्या गेल्या. राहुल गांधी यांच्या सोबत घडलेला प्रसंग आणि त्यानंतर माध्यमांना पिडीत कुटूंबाला भेटण्यासाठी केलेला मज्जाव देखील बातमीचा विषय ठरला.
उन्नाव आणि हातरस साऱख्या घटना या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे हे सांगणा-या आहेतच या स्थिती नक्कीच चांगली नाही. अशा घटना घडल्यावर प्रसार माध्यमांना रोखणे नेत्यांना भेटायला न जाऊ देणे हे देखील योग्य नाही. यासाठी उत्तर प्रदेश सरकारला नक्कीच जाब विचारायला हवा.
पण महाराष्ट्रातील जी मंडळी यावर भाष्य करत आहेत त्यांना कांही घटना सांगणे आवश्यक आहे. त्या घटना खुपच गंभीर आहेत. अनलॉकची घोषणा केल्यानंतर राज्यातील सरकारने पुनश्च हरीओमचा गजर केला आणि राज्यात गाजलेल्या खालील घटना या लक्षणीय आहेत. महाऱाष्ट्रातील राजकीय मंडळीना उत्तरप्रदेशमधील घटनेवर बोलण्याचा अधिकार आहे का? हाच प्रश्न निर्माण होतो.
मागील तीन महिण्यात सतरा भयंकर घटना राज्यात घडल्या आहेत. त्यात तीन वर्षाच्या मुलीला देखील नराधमांनी सोडलेले नाही. निवासी डॉक्टरची छेड. कोविड सेंटर मधील महिला कर्माचा-यांचा विनयभंग, कोरोनाबाधीत महिलेवर बलात्कार अशा घटना देखील घडल्या आहेत. यात सामुहिक बलात्कार आहेत आणि अल्पवयीन मुलीवरचे बलात्कार देखील.
१) ७ जुलै औरंगाबादेतील तरूणीवर मुंबईत सामुहीक बलात्कार
२) ३० जून मंठा जिल्हा जालना येथे नवविवाहितेवर चाकू हल्ला करून हत्या.
३) २४ जुलै करंजविहिरे ता.खेड जि.पुणे अल्पवयीन मुलीवर बलात्कार दगडाने ठेचून हत्या.
४) २५ जुलै नांदुरा जि.बुलडाणा 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
५) २६ जुलै तांबडी जि.रायगड 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
६) २८ जुलै मुंबईत चालत्या गाडीत 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
७) ३ ऑगस्ट पाबळ जि.पुणे 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार
८) ४ ऑगस्ट कराड जि.सांगली 10 वर्षाच्या मुलीवर 54 वर्षाच्या व्यक्तीकडून बलात्कार
९) ४ ऑगस्ट औरंगाबाद भांगसीमाता गडावर 20 वर्षीय मुलीवर बलात्कार
१०) ७ ऑगस्ट चंद्रपरात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार आत्महत्या
११) १३ ऑगस्ट जळगाव मध्ये 2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार
१२) १३ सप्टेंबर धारावीत 5 वर्षीय मुलीवर वृध्दाकडून बलात्कार
१३) ७ जुलै औरंगाबादेतील तरूणीवर मुंबईत सामुहीक बलात्कार
१४) ९ सप्टेंबर मानखुर्द कोविड सेंटरमध्ये विनयभंग
१५) २६ सप्टेंबर पुणे जम्बो कोविड सेंटर महिला डॉक्टरचा विनयभंग
१६) १ ऑक्टोबर औरंगाबादच्या घाटी रूग्णालयातल्या महिला डॉक्टरला चाकू हल्ल्याचा प्रयत्न

अशा घटना घडलेल्या असताना सलेक्टीव्ह विरोध करणारे राज्यातील घटनांकडे मात्र सोयिस्कर डोळेझाक करताना दिसतात. राज्य कोणते, सत्ता कोणाची आणि जात धर्म कोणता यावर जर बलात्काराचे गांभीर्य ठरत असेल तर राहुल गांधी यांनी यमुना एक्सप्रेसवे वर जो प्रकार केला. तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर देखील करायला हवा. मराठवाड्यात देखील भेट द्यावी आणि योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्या सरकारला देखील जाब विचारायला हवा.
राज्य भाजपाचे असो की आघाडीचे किंवा युतीचे बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. या घटनांचा गवगवा मात्र पक्ष जात आणि धर्म बघून झाला आहे.