भिंवडी येथील तीन मजली इमारत कोसळली,10 जणांचा मृत्यू

1 min read

भिंवडी येथील तीन मजली इमारत कोसळली,10 जणांचा मृत्यू

इमारतीच्या ढिगा-या खाली सुमारे १०० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RNO/भिवंडी : भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड येथे एक तीन मजली इमारत पत्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून दुर्घटना घडली असून रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने या इमारतीच्या ढिगा-या खाली सुमारे १०० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पटेल कंपाऊंड येथील सुमारे तीस वर्षे जुनी एल टाइप मधील ही जीलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करून या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती .

या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे गाडले गेले आहेत .घटनास्थळी अग्निशामक व ठाणे येथील TDRF व NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. बचाव कार्य चालू असून आतापर्यंत २३ जणांना बाहेर काढण्यात आलेले आहे, त्यापैकी १० मयत व एकूण १३ जण जखमी आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधीत ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.