विजय कुलकर्णी/परभणी : राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्रा द्वारे नोकरी मिळवलेल्या २५८ उमेदवारांची नियुक्ती रद्द करून प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली.
राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्राव्दारे नोकरी मिळवलेल्या दोषी कर्मचार-यांविरूध्द कठोर कारवाई करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आ.बाबाजानी दुर्राणी यांनी राज्याचे क्रीडामंत्री केदार यांच्याकडे तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकीत प्रश्नसुध्दा उपस्थित केला होता. आ.शशिकांत शिंदे,आ.विक्रम काळे,आ.अमोल मिटकरी यांनीही या अनुषंगाने मुद्दे उपस्थित केले होते. विशेषतः राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना नोकरीत ५ टक्के आरक्षण असल्याचा फायदा घेऊन सुमारे २०० हून अधिक उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रे काढून नोकरीचा लाभ घेतल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करीत संबधित दोषींविरूध्द कठोर कारवाई करावी,असे नमूद केले होते.
मंत्री.केदार यांनी चौकशीचा अहवाल क्रीडा उपसंचालक औरंगाबाद यांच्या समितीने शासनाकडे सादर केला आहे, अशी लेखी माहिती दिली. संबंधित दोषींविरोधात चौकशी अंती निलंबनाची कारवाई तसेच फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत का,अशीही विचारणा या आमदार महोदयांनी केली होती. त्यास लेखी उत्तराद्वारे केदार यांनी ट्रॅम्पोलिन व टबलिंग या खेळ प्रकारात २५८ जणांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून सरकारी आरक्षणाचा गैरफायदा घेतला. त्यांच्याविरोधात क्रीडा व युवक संचालनालयाच्या आयुक्तांद्वारे कसुन चौकशी सुरू आहे. त्या उमेदवारांचे नियुक्तीपत्रही रद्द करून प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार करण्याबाबत नियुक्ती प्राधिकरणास सुचितही करण्यात आले आहे,असे केदार यांनी म्हटले.