चला वारीला सुखाचा शोध घ्यायला

1 min read

चला वारीला सुखाचा शोध घ्यायला

वारी आपल्या प्रवाहात सर्वांना सहभागी करून घेत पुढे सरकत असते. आणि यातच ख-या सुखाचा शोध लागत असतो. हाच सुखाचा शोध घेण्यासाठी आपपण शब्दवारीत सहभागी होणार आहोत.

कपाळी चंदन, गळ्यात तुळशीमाळ, मुखी विठ्ठलनाम, हाती टाळ. देहूवरून तुकोबाराय, आळंदीतून ज्ञानदा, मुक्ताईनगरातून मुक्ताई नरसीतून नामदेव पैठणमधून एकनाथ अशी संगळी संतमंडळी प्रतिमात्मक अर्थानी विठू माऊलीच्या दर्शनाला निघतील. आणि यांच्यासोबत असेल लाखो वारक-यांची मांदियाळी. आषाठीची ही वारीच विलक्षण असते. महाराष्ट्राचे रस्ते भक्तीनी ओसंडून वाहू लागतात. प्रत्येक रस्त्यावरून हरीनामाचा गजर करत भगव्या पताका घेऊन लोक जाणारे भाविक दिसतात. वारीला का जायचं? काय असतं वारीत पाण्याबाहेर राहून जसा खोलीचा अंदाज येत नाही, तसच या वारीच आहे. दिंडीत तुम्ही सामील झाल्याशिवाय याचा आनंद कळणेच कठीण विलक्षण तृप्पता देणारे समाधान या वारीतून मिळते.
एकदा देव दानव आणि मानव तिघे मिळून ब्रम्हदेवाकडे गेले आणि देवाला म्हणाले ब्रम्हाजी, “आम्हाला सुखाचा मंत्र सांगा”. ब्रम्हदेवानी किंचितस हास्य करत तिघांनाही सांगितले की, “मी तुम्हाला सुखाचा मंत्र हवाय ना. मग आषाढाची वाट पहा आषाढात तुम्हाला तुमच्या सुखाचा मंत्र मिळून जाईल.” सगळे आपापल्या ठिकाणी परतले आणि आषाढाची वाट पाहू लागले. आषाढ आला पण मंत्र काही मिळेना. परत सगळे ब्रम्हदेवाकडे गेले म्हणाले, “देवा, मंत्र काही मिळत नाही काय करावे? “ ब्रम्हाजीनी परत गुढ हास्य करत सर्वांना विचारले, “तुम्ही आषाढातील मेघांचा आवाज ऐकला आहे का. विशेषतः तेंव्हा जेंव्हा ते पाण्यानी भरून काळे झालेले असतात.” माणुस म्हणाला, “हो ऐकलाय तो आवाज दSदSददददददद असा असतो.” पितामह ब्रम्हा हसले आणि म्हणाले, “तुम्हा सगळ्यांसाठी हा द च सुखाचा मंत्र आहे. जा आता.” सगळेच विचार करू लागले हे ‘द’ अक्षर आपल्यासाठी सुखाचा मंत्र कसा असेल? सगळ्यात पहिल्यांदा देवांची वेळ होती. देवांनी विचार केला आपल्याकडे स्वर्ग सुख आहे. ऐश्वर्य आहे. अप्सरा आहेत, सगळेच आहे. मात्र आपल्याला सुखी व्हायचे असेल तर हे सुख उपभोगण्याच्या इच्छेचे दमन करावे लागेल. द म्हणजे दमन असा अर्थ देवांनी घेतला आणि आपल्या सुख उभोगण्याच्या ईच्छेचे दमन करून ते सुखी झाले.
आता पाळी राक्षसांची होती. ते देखील विचार करू लागले काय असेल आपल्यासाठी द चा अर्थ? राक्षसांना विचार केला, आपण बलशाली आहोत. आपल्याला अनेक मायावी शक्ती अवगत आहेत. आपल्या बळाने वाटेल ते करू शकतो. पण तरीही आपण सुखी नाहीत कारण आपण आपल्या शक्तीचा चुकीचा वापर करतो. अन्याय करतो. आपण दया दाखवली तर लोक आपल्याला चांगले म्हणतील आणि आपण सुखी होऊ. दानवांनी आपल्यासाठी द या शब्दापासून दया हा सुखाचा मंत्र घेतला
माणुस मात्र गंभीर होता. त्याच्याकडे देवासारखे ऐश्वर्य नव्हते की दानवासारखे बळ पण अनेक माणसांजवळ अनेक गोष्टी होत्या तशा त्या अनेकाजवळ नव्हत्या देखील ज्यांच्या जवळ जे आहे ते त्यांनी ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांना द्यावे म्हणजे आपण सुखी होऊ याची जाणिव माणसांना झाली आणि त्यांनी आपल्या सुखाचा मंत्र शोधला द म्हणजे दान.
देवासाठी दमन, दानवांसाठी दया आणि माणसांसाठी दान हा सुखाचा मंत्र सापडला तो आषाढातील मेघगर्जेनेतून. तसाच सुखाचा मंत्र या आषाढी वारीत सापडतो. सुखांच्या ईच्छांचे दमन करण्याची सवय वारीतच लागते. पायी चालत मन विठ्ठलाच्या ठायी एकाग्र झाले की आपल्या बळाचा गैरवापर करण्याची वृत्ती मनात येतच नाही.’ भुता परस्परे जडो मैत्र जिवांचे’ ही भावनाच मनात दयाभाव जागा करते. पैठणच्या वाळवंटात गाढवाला पाणी पाजणारे नाथ हाच तर दया मंत्र देतात ना.
खरतर दान हा विलक्षण समाधान देणारा विषय आहे. आपल्याजवळ जे आहे त्यातील थोडे ज्याच्याकडे नाही अशा व्यक्तीला दिल्यावर त्याच्या मनातील समाधान आपल्याला विलक्षण आनंद देऊन जाते. दमन, दया, दान हा सुखाचा मंत्र आपल्याला वारीतून मिळतो. म्हणूनच वारीसाठी जायला हवे. एकदा हे तीन मंत्र अनुभवून पहा मग ते सावळ्या सुंदर विठ्लाचे राजस सुकूमार रूप आपल्याला खुप सुंदर दिसेल.