नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. अशात याचं रुपांतर वादळात होऊ शकतं. त्यामुळे 5 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करण्यासाठी जाऊ नये. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. या 5 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्री भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो. तर यावेळी मोठ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रविवारी हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून पुढच्या आठवड्यात देशाच्या इतर भागांतून परत येण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे पावसाळा आणखी पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढच्या 24 तासांत याचं रुपांतर वादळात होऊ शकतं. हे वादळ 12 ऑक्टोबरच्या रात्री नरसापूर आणि विशाखापट्टणमच्या मधे आंध्र प्रदेशच्या किनारी भागातून पार होऊ शकतं. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगनासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.