तब्बल सहा वर्षानंतरही फेरफार अर्ज प्रलंबित

तलाठी, मंडळाधिकार्‍यांची वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली

तब्बल सहा वर्षानंतरही फेरफार अर्ज प्रलंबित

परभणीः शेतजमीन फेरफार अर्ज तलाठ्यांकडे देणे व तो अर्ज मंजुर होणे हे तसे अतिशय साधे आणि सोपे काम आहे. परंतु कोथळा येथील कै. नागोराव गोरे यांना फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल ५ वर्ष उलटली. प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत त्यांची प्राणज्योत मालवली. तरीही अद्याप तो फेरफार अर्ज मंजुर झालाच नाही.

मानवत तालुक्यातील कोथळा येथे नागोराव गोरे व त्यांचे दोन मयत बंधू कुंडलीक व संतराम गोरे यांच्यात सामाईकरित्या ५ हेक्टर ४४ आर. शेतजमीन आहे. कुंडलीक गोरे व संतराम गोरे यांचे निधन झाल्यानंतर नागोराव गोरे हेच वारस होते. त्यांना कायदेशीररित्या वारस प्रामाणपत्रही मिळाले. त्यानंतर मानवत येथील तलाठी उज्वल तंवर यांच्याकडे २३ ऑगस्ट २०१६ रोजी फेरफार करण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही फेरफार झाला नाही. याची नागोराव गोरे यांनी चौकशी केली असता, बाबाराव गोरे नामक व्यक्तीने आक्षेप दाखल केल्याने हे प्रकरण मानवत येथील तहसीलदारांकडे वर्ग झाल्याचे त्यांना कळवण्यात आले. यावर नागोराव गोरे यांनी तहसीलदारांच्या समोर बाजु मांडली. मात्र या प्रकरणात तलाठी व बाबाराव गोरे यांनी कुठलेही म्हणणे सादर केले नाही. परिणामी तहसीलदारांनी नागोराव गोरे यांच्या अधिकारात २ मे २०१७ रोजी कार्यालय आदेश काढून फेर घेण्याबाबत तलाठ्यांना निर्देशीत केले. तरी देखील तलाठ्यांनी फेरफार केला नाही. कंटाळून शेवटी नागोराव गोरे यांनी पाथरी येथील उपविभागीय अधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज दाखल केला.

उपविभागीय अधिकार्‍यांनी तलाठी व बाबाराव गोरे यांना वारंवार हजर राहण्यासाठी सुचित केले, मात्र हे दोघेही हजर झालेच नाहीत. आश्चर्य म्हणजे या प्रकरणाशी संबंध नसलेली बबीता गोरे नामक व्यक्ती हजर झाली. यावर कायदेशीर प्रक्रीया पार पडून उपविभागीय अधिकार्‍यांनी ३१ नोव्हेंबर २०१७ रोजी नागोराव गोरे यांच्या बाजुने आदेश पारित करून तलाठ्यांना फेर करण्यास सांगीतले. तरीही तलाठी उज्वल तंवर व मंडळाधिकारी योगेंद्र नादापुरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत फेर घेतलाच नाही. उलट टाळाटाळ करत उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशावर तहसीलदारांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी मंडळा अधिकार्‍यांनी अर्ज केला. या अर्जातही तहसीलदारांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नसून दिशाभूल करून वेळकाढूपणा करत असल्याचे उत्तर दिले. याला मंडळाधिकारी जबाबदार राहतील असेही सुचवले. या दरम्यान नागोराव गोरे यांचा २० जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा संभाजी गोरे यांनी पाथरी येथील उपविभागीय अधिकार्‍यांकडे ११ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केला. यावर १ फेबु्रवारी २०२१ रोजी उपविभागीय अधिकार्‍यांनी तलाठी व मंडळाधिकार्‍यांना २ दिवसात लेखी अहवाल सादर करण्याची नोटीसही बजावली. याला कुठलाही प्रतिसाद दोघांनीही दिला नाही. त्यावर १७ फेबु्रवारी २०२१ रोजी तलाठ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली. या नोटीसीलाही या दोन्ही अधिकार्‍यांनी अंमलबजावणी न करता केराची टोपली दाखवली. अखेरीस वैतागुन संभाजी गोरे यांनी २३ फेबु्रवारी २०२१ रोजी मानवत येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला. न्यायालयाने या दोन्ही अधिकार्‍यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले. या प्रकरणात साक्षीदार म्हणून मानवत येथील तहसीलदार, पाथरी येथील उपविभागीय अधिकारी यांचाही समावेश केला गेला. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी व अ‍ॅड. संतोष काटकर यांनी बाजु मांडली.

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन न करता शेतकर्‍यांना वेठीस धरणारे तलाठी उज्वल तंवर हे या पूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले असून त्यांच्या विरोधात परभणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.