चारित्र्य पडताळणी आणि अधिकारी चरित्र

अनेक प्रयत्न करुनही चारित्र्य प्रमाणपत्र न मिळाल्याने सुरेश पिंगळे नावाच्या एका व्यक्तिने आयुक्त कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती.

चारित्र्य पडताळणी आणि अधिकारी चरित्र

महाराष्ट्रः पुण्यात सुरेश पिंगळे नावाचा एक सरकारी नोकरी करणारा व्यक्ति होता. सरकारी नोकरीत जायचं असेल तर चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक असतं. पुरुषांच चारित्र्य हे सरकार दरबारी चांगल असायला पाहिजे असा प्रघात आपल्याकडे आहे. म्हणूनच सुरेश पिंगळे सरकार दरबारी, मी चांगल्या वर्तनाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी गेले होते. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक कार्यालयात मिळतं. हे प्रमाणपत्र मागण्यासाठी पिंगळे आयुक्तांकडे गेले पण अनेक दिवस झाले तरीही प्रमाणपत्र मिळालं नाही. त्यांनी या मागचं कारण विचारलं तेव्हा, पुण्याच्या कोथरुड, सहकार नगर आणि समर्थ नगर पोलिस ठाण्यात पिंगळे नावाच्या व्यक्तिवर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र मिळणार नाही असं आयुक्त कार्यालयातील चारित्र्य पडताळणी विभागाने सांगितलं.

सुरेश पिंगळेने आपलं चारित्र्य चांगलं आहे, कोणतेही गुन्हे नाहीत हे वारंवार सांगितलं मात्र पोलिसांनी ते ऐकलं नाही. अनेकवेळा स्पष्ट करुनही एका कागदामुळे त्याच चारित्र्य संशयाच्या घे-यात सापडलं होतं. या संशयाच्या घे-यातुन बाहेर येण्यासाठी तो आटापीटा करत होता कारण नोकरी मिळणार होती. नोकरी मिळाली तर जगता येईल अशी स्थिती होती, त्यात नोकरीची संधी हाती मिळाली परंतु एका चारित्र्य प्रमाणपत्रामुळे त्यात अडथळा निर्माण झाला होता. नोकरी नाही म्हटल्यावर कौटुंबीक तणाव असणारच, या तणावातुन आणि प्रमाणपत्र न मिळाल्याच्या नैराश्यातुन सुरेश पिंगळेंनी आयुक्त कार्यालयासमोर स्वतःला जाळून घेतलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. महाराष्ट्रात कोणाचा मृत्यु झाल्याशिवाय त्याची व्यथा ऐकुन घेतली जात नाही. मयतांच्याच वेदना आपल्याला कळतात, मात्र जिवंतपणी त्याला आलेल्या अडचणी कोणीही जाणुन घेत नाही.

सुरेश पिंगळेचा मृत्यु झाल्यावर त्याची व्यथा लोकांच्या लक्षात आली आणि चौकशीला सुरुवात झाली. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वळसे पाटलांनीसुद्धा ही घटना दुर्देवी असल्याचं सांगितलं. आता चौकशी होईल, कारवाई होईल मात्र सुरेश पिंगळेचा गेलेला जीव परत येणार नाही. या मृत्युने पिंगळेंच्या व्यक्तिगत समस्यांचा अंत झाला पण आता त्यांच्या कुटुंबाच्या समस्यांना सुरुवात झाली आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे आयुक्तपदी येण्याआधी सक्तिच्या रजेवर होते आणि सक्तिच्या रजेवर जाण्याआधी गृहविभागाचे प्रधान सचिव होते. त्यांनी एक चारित्र्य प्रमाणपत्र काढलं होतं आणि ते वाद्वान कुटुंबाचं होतं. हे वाद्वान कुटुंब खंडाळ्यावरुन महाबळेश्वरच्या आपल्या बंगल्यात जाणार होतं. तेव्हा लॉकडाऊनमध्ये आयुक्त गुप्तांनी 'हे माझे मित्र आहेत आणि त्यांना प्रवासासाठी मदत करावी' असं प्रमाणपत्र वाद्वान कुटुंबाला दिलं होतं. हे प्रमाणपत्र सरकारच्या मागणीशिवाय पुरवण्यात आलं होतं आणि त्याच्या आधारावर एकही अडथळा न येता त्यांचा प्रवास पुर्ण झाला. विशेष बाब म्हणजे या वाद्वान कुटुंबावर मोठ्या बँक घोटाळ्याचा आरोप होता आणि त्याच महाबळेश्वरच्या बंगल्यावरुन त्यांना नंतर अटक करण्यात आली होती. याचा अर्थ असा की, एका चारित्र्यहीन, पैशाचे घोटाळे करुन अनेकांची फसवणुक करणा-या माणसाला चारित्र्यप्रमाणपत्र देणारे गुप्ता, एका सामान्य माणसाचं चारित्र्य प्रमाणपत्र त्याला देऊ शकले नाहीत. तसंच नामसाधर्म्यामुळे प्रमाणपत्र देऊ शकले नाहीत हे मान्यही करु शकले नाहीत. आता बदललेले गृहमंत्री एखाद्या सामान्य पोलिस कर्मचा-यावर कारवाई करतील पण ज्या अमिताभ गुप्तांनी अगदी कमी वेळेत वाद्वानला प्रमाणपत्र दिलं होतं तसंच सुरेश पिंगळेला दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं.

फक्त एक सुरेश पिंगळे नाही तर त्याच्यावर अवलंंबुन असणा-या कुटुंबातील सदस्यांना मरणापेक्षाही वाईट यातनांचा सामना करावा लागणार आहे. ज्यांना चारित्र्यप्रमाणपत्र द्यायला नको त्यांना दिलं जातं आणि त्याची बक्षिसी म्हणून पुण्याचं आयुक्तपद अमिताभ गुप्तांना दिलं जातं. एका सामान्य माणसाला प्रमाणपत्र दिलं जात नाही आणि  त्यालाच आत्महत्या करावी लागते. अशा पद्धतीने चारित्र्य प्रमाणपत्र देणं बंद करायला हवं. खरंतर ज्यांनी लोकांना लुटलं आहे, घोटाळे केले आहेत, चोरी करणा-या लोकांना प्रमाणपत्र दिली त्यांच चरित्र आणि चारित्र्य तपासलं गेलं पाहिजे. आक्षेप घ्यायचाच असेल तर तो बँक लुटणा-या चोरांवर घ्यायला हवा, त्यांना योग्य म्हणणा-या पोलिस अधिका-यांवर आणि त्यांना पाठिशी घालणा-या राजकीय लोकांवर घ्यायला हवा.  

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.