मुख्यमंत्र्यांची पोलखोल

कोकणात भास्कर जाधवांनी प्रशासनाच्या नावावर सरकरारवर केलेले आरोप आपण पाहिले. त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी जी मुख्यमंत्र्यांची पोलखोल केली आहे ती खरोखर भयंकर आहे.

मुख्यमंत्र्यांची पोलखोल

महाराष्ट्रः राज्यात सध्या काय चालू आहे? असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. लोक उठसुट सरकारची पोलखोल करु लागले आहेत. विरोधीपक्षातल्या लोकांनी करणं आणि सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कोकणात भास्कर जाधवांनी प्रशासनाच्या नावावर सरकरारवर केलेले आरोप आपण पाहिले. त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी जी मुख्यमंत्र्यांची पोलखोल केली आहे ती खरोखर भयंकर आहे. सुरुवातीला अपक्ष म्हणून आणि नंतर भाजपकडून दोनवेळा निवडुन आलेले प्रशातं बंब यांची कारकिर्द कायमच चर्चेत राहणारी आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढणार आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. अगदी स्वकीयांचे आरोपही त्यांनी स्विकारला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. स्वतःच्याच पक्षातल्या मंडळींनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण ते मागे हटले नाहीत. पक्षाचे अध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या बांधकाम विभागावरही त्यांनी समर्थपणे आरोप केले होते. यात त्यांना त्रास झाला मात्र आपल्या विषयांचा पिच्छा त्यांनी सोडला नाही.

याच प्रशांत बंब यांनी कोरोनाच्या काळात त्यांच्या गंगापुर मतदारसंघात प्रचंड काम केलं. अगदी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची मोफत व्यवस्था करत हजारो रुग्णांना जिवदान त्यांनी दिलं. हेच प्रशांत बंब फेसबुकवर लाईव्ह आले, आता फेसबुकवर लाईव्ह येणं हा आपल्या राज्याचा प्रघात होऊ लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच जर लाईव्ह संवाद साधत असतील तर आमदारांनाही नाईलाजाने फेसबुकवरुन संवाद साधावा लागतो. हे लाईव्ह यासाठी महत्त्वाचं आहे कारण प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेले मुुद्दे आणि मुख्यमंत्री जी आपली प्रतीमा तयार करत आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि वास्तवही समोर येईल. मुळात प्रशांत बंब यांनी काही मागण्या केल्या आहेत.

बंब यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. विरोधीपक्षाचा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागतो परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून तशी भेट दिली जात नाही. अनेकवेळा पत्रव्यवहार, फोन होतात तरीही बोलणं होत नाही. अगदी १९ वेळा पत्र पाठवूनही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी प्रशांत बंब यांना वेळ देत नाहीत. त्या पत्रांची उत्तरंही मुख्यमंत्र्यांनी दिली नाहीत. पत्र मिळाल्याची पोहोच येते मात्र उत्तर मिळत नाही. आमदारांच्या पत्राची जराशीही दखल मुख्यमंत्र्यांच कार्यालय घेत नाही. निधी मिळणं, कामं होणं याबाबत काहीच काळजी नसल्याचं दिसत आहे. त्यांच्या मतदारसंघातमध्ये येणारे शुलिभंजन, म्हैसमाळ, खुलताबाद या भागांमध्ये अनेक विकासकामं चालू आहेत. निधी आभावी कंत्राटदार कामं सोडून गेले आणि ही कामं बंद पडली आहेत. या कामांसाठी किंवा काही इतर उपाययोजनांसाठीची पत्र पाठवली जात आहेत विरोधी पक्षाच्या आमदारांच्या पत्रांची दखल उद्धव ठाकरे घेत नाहीत हे प्रशांत बंब यांनी फेसबुकच्या माध्यमातुन जाहीरपणे सांगितलं.

याचा अर्थ आम्ही विकासात राजकारण करत नाही हा दावा फोल ठरतो आणि विकासात राजकारण होतंच. विरोधी पक्षाच्या आमदाराला भेटायचं नाही हा निर्णय मुख्यमंत्री घेतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख नाहीत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला एखाद्या व्यक्तिला भेटायचं की नाही हे अधिकार असु शकतात मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बहुतेक आमदारांना भेटावं लागतं कारण ते लोकप्रतिनिधी असतात आणि याच आमदारांच्या पाठिंब्याच्या बळावर ते मुख्यमंत्रीपदी बसलेले असतात. किमान लोकांच्या कामासाठीतरी मुख्यमंत्र्यांनी भेटणं अपेक्षित आहे मात्र मुख्यमंत्री भेटत नाहीत ही वस्तुस्थिती या निमित्ताने समोर आली.

भास्कर जाधवांनीही अशाच पद्धतीचा सुर कोकणात लावला होता. अगदी शिवसेनेच्या आमदारांमध्येही अस्वस्थता आहेच. या सगळ्यात रामदास कदम कुठे आहेत? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. पुर्वी पर्यावरणमंत्री असताना त्यांच नाव कायम चर्चेत असत पण आता बातम्यांमध्येही ते दिसत नाहीत. सरनाईकांची भूमिका आपण ऐकली, तानाजी सावंतांसारखा माणुस आमदार असुनाही कुठे आहे असा प्रश्न पडतो. विरोधी पक्ष असो किंवा स्वतःचा पक्ष, लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री भेटत नाहीत हे वास्तव या निमित्ताने समोर आलं आहे.

प्रशांत बंब यांनी फेसबुकच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला मात्र हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे की नाही, ते माहिती नाही. परंतु बंब यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. कोरोनाची व्याप्ती वाढते आहे, हे माहिती असताना मुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणुन काय नियोजन केलं? किती दवाखाने उघडले, किती डॉक्टरांची भरती केली? असे कळीचे प्रश्न प्रशांत बंब यांनी विचारले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी काहीच न बोलता, काही घडले नाही याची जाणीव करुन दिली आहे. आरोग्य क्षेत्रात न झालेल्या भरतीबाबत आणि शिक्षण क्षेत्राबाबत प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडुन कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळेच बंब यांनी मुख्यमंत्र्यांची पोलखोल केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही प्रचंड काम करतो आहोत अशी जी प्रतिमा निर्माण केली जाते आहे. परंतु कोरोनाशी लढण्यासाठीची यंत्रणा मुख्यमंत्र्यानी उभी केली आहे का? हा प्रशांत बंब यांनी विचारलेला प्रश्न अतिशय गंभीर आहे. म्हणून हा एका आमदाराचा संवाद नव्हता तर प्रातिनिधीक स्वरुपाचा संवाद होता. अर्थात हा संवाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र या संवादातुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आणखी एक प्रतिमा उघड झाली आहे, हे नक्की.    

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.