चिरतरूण विलासराव!

1 min read

चिरतरूण विलासराव!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन.. विलासरावांना जाऊन आज आठ वर्ष झाली पण त्यांच ते चिरतरूण व्यक्तिमत्त्व आजही डोळ्यांसमोर तसंच्या तसं हजर असल्याचा भास होतो.

ओम देशमुख:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन विलासरावांना जाऊन आज आठ वर्ष झाली पण त्यांच ते चिरतरूण व्यक्तिमत्व आजही डोळ्यांसमोर तसच्या तसं हजर असल्याचा भास होतो.ओम देशमुख-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. विलासरावांना जाऊन आज आठ वर्ष झाली. पण त्यांच ते चिरतरूण व्यक्तिमत्व आजही डोळ्यांसमोर तसच्या तसं उभं असल्याचा भास होतो.विलासराव देशमुख म्हणजे एक रुबाबदार, हजरजबाबी,अष्टपैलू, शासन आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेलं, पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांनाही आपलसं करणारं अजातशत्रु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व!लोकनेते स्व. विलासराव देशमुख हे नाव कानावर पडलं की डोळ्यातून नकळत अश्रूधारा ओघळतात. आठवणींचा एक जीवनपट डोळ्यांसमोरुन जातो.विलासराव लोकनेते होते आणि कायम लोकनेतेच राहतील.तुमचा चेहरा,आवाज आणि रुबाब केसांवरुन कंगवा फिरवण्याची ती एक विशिष्ठ लकब, तुमची हेलिकॉप्टरमधून होणारी भारदस्त एंट्री, पांढरेशुभ्र कपडे त्यावरचं जॅकेट, डोळ्यांवरचा रेबनचा काळा चष्मा हे सगळं आजही डोळ्यांसमोर तसच्या तसंच आहे.मराठवाड्यासारख्या दुर्गम, अविकसित आणि दुष्काळी भागातून आलेल्या विलासराव देशमुख,गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या तीन युवकांनी पुढे जाऊन राज्यात आणि देशात कर्तृत्व गाजवलं.विलासरावांची कौटुंबिक, सांपत्तीक आणि राजकीय पार्श्वभूमी मुंडे महाजन यांच्यापेक्षा उजवी होती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे वडील गावचे सरपंच होते. राजकीय आणि परंपरागत चालत आलेल्या देशमुखीमुळे सामाजिक क्षेत्रात त्यांच्या घराचं साहजिकच वर्चस्व होतं. शालांत शिक्षण पूर्ण केल्यावर विलासराव वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले आणि तिथंच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.ज्या कॉलेजमध्ये विलासराव शिकत होते. त्या कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राज्याच्या कानाकोप-यातील विभागाचे विद्यार्थी राहत होते, त्यापैकी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे संघटन करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सोडवणे असं काहिसं कार्य त्यांनी सुरु केलं आणि इथंच त्यांच्या राजकीय कारकिर्दिला पैलू पडत गेले. अचानकपणे तिथं त्यांची भेट गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत झाली आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक ‘दो हंसों का जोडा’ मिळाला की ज्याने राज्याच्या राजकारणात पक्षाच्या परिघा बाहेरच्या मैत्रीचा एक नवा अध्याय लिहीला. गोपीनाथराव-विलासराव ही जोडगळी राज्याच्या राजकारणात एकाच वेळी प्रवेश कर्ती झाली And Rest Is History.विलासराव महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन गावी परतले आणि सक्रिय राजकारण करु लागले. बाभळगावचे सरपंच, पंचायत समिती, आमदारकी,दोनदा राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि शेवटी देशाचे ग्रामविकास मंत्री असा एक खूप मोठा आणि यशस्वी प्रवास विलासरावांनी अत्यंत दमदार आणि राजकीय चातुर्याने पूर्ण केला.विलासराव मुख्यमंत्री झाले तेव्हा आपसुकच मराठवाड्याला त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या, त्यापैकी किती पूर्ण झाल्या आणि किती नाही यात जाण्याची आता आवश्यकता नाही. त्यांच मराठवाड्यासाठी योगदान किती हा विषय देखील महत्वपूर्ण आहे.मराठवाड्याचा वर्षानूवर्ष प्रलंबित असलेला पाणी प्रश्न असो किंवा मराठवाड्याची म्हणावी तशी न झालेली औद्योगिक प्रगती हे प्रश्न विलासरावांच्याही काळात अनिर्णितच राहिले ज्याची खंतही त्यांना होती. हे प्रश्न निकाली का निघाले नाही हे ही ते खाजगीत बोलून दाखवत.पण एक गोष्ट मात्र मान्य करावीच लागेल की त्यांनी त्यांच्या ‘सुगी’ च्या दिवसात लातुरला एका विशिष्ट पातळीवर नेऊन ठेवलं.‘जगात जे जे नवे ते ते लातुरला हवे’ हा विकासाचा ‘लातुर पॅटर्न’ विलासरावांनी प्रस्थापित केला.एक किस्सा आवर्जून नमूद करावा वाटतो. जेव्हा विलासराव शिक्षणमंत्री झाले तेव्हाच योगायोगाने दहावी बोर्डात लातुरची मुलं सर्वाधिक मार्कानी पास होऊ झाली.एका खोडील पत्रकाराने बातमी केली की ‘शिक्षणमंत्री लातुरचे म्हणून लातुरची मुलं पहिली येतायेत’सवयीप्रमाणे विलासराव त्यावर रिऍक्ट झाले पण त्यांनी ते लक्षात ठेवलं, कालांतराने विलासराव दुस-या पदावर गेले तरीही लातुर पॅटर्नचा दबदबा चालूच राहिला तेव्हा मात्र विलासरावांनी खासगीत त्या पत्रकाराला योग्य तो संदेश पोहोचवला आणि त्याचा तो गैरसमज दूर झाला.जेमतेम परिचित आणि काही वेळा अपरिचित लोकांना आपलसं करण्याची एक हातोटी विलासरावांना अवगत होती. समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदबीने व सस्मित सामोरे जात ज्यामुळे कोणीही क्षणार्धात त्यांच्याशी जोडले जात.हा त्यांचा स्वभाव होता. लोकांवर छाप पाडण्याची ती त्यांची ‘देशमुखी’ पद्धत होती.अजातशत्रूत्वासाठी जी एक चतुराई लागते ती विलासरावांच्या अंगीभूत गुणांपैकी एक होती.वक्तृत्व ही विलासरावांची भक्कम बाजू होती.विरोधकावर केलेली खोचक टिकाही विलासराव इतक्या विनोदी पद्धतीने बोलून दाखवायचे की भाषण संपल्यावर ब-याच वेळाने संबंधित व्यक्तीला समजायचं की ते काय बोलले होते.अनेक राजकीय सभा, समारंभ असे आहेत जे केवळ आणि केवळ विलासरावांच्या मार्मिक टोलेबाजी व मर्मभेदी विनोदांमुळे इतिहासात अजरामर झाले. त्यात जर मुंडे - विलासराव जोडगोळी असेल तर लोक लांबून ती मेजवानी चाखायला यायचे आणि त्यातून मिळालेला ठेवा हृदयाच्या एका कोप-यात जमा करून जायचे.विलासराव दोनदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि विचित्र पद्धतिने पायउतारही झाले.पक्षांतर्गत विरोधक ‘नारायण नारायण’ म्हणत विलासरावांच्या मुख्यमंत्री पदामागे नेहमी संकट उभी करत. पण एकदा १० जनपथला चक्कर मारली की सगळे नेते हातात हात घेऊन हात उंचावत सारं काही आलबेल आहे असं सांगत आणि त्यावर तात्पुरता पडदा पडत.ज्या लातूर जिल्ह्यातुन विलासराव आले तो जिल्हा म्हणजे राजकीय धुरीणांचा जिल्हा म्हणून राज्यात परिचित होता.माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव कव्हेकर अशी दिग्गज राजकीय माणसं असलेल्या जिल्ह्यातील या प्रस्थापितांना शह देऊन स्वत:ची ओळख निर्माण करणं आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणं हे केवळ विलासरावांना जमू शकलं.दिल्लीत झालेल्या India Against Corruption प्रणित अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची यशस्वी सांगतादेखील विलासरावांच्या ‘मध्यस्थी’चं फलित होतं.रितेशची फिल्मी एंट्री,सानंदा सावकारी प्रकरण, दिग्दर्शक सुभाष घईच्या ‘व्हिसलींगवूड’च्या जमिनीचा तथाकथित गैरव्यवहार वा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी केलेलं टेरर टूरीझम. प्रत्येक आरोप त्यांना प्रमोशन देत गेलं.शेवटच्या काही दिवसात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत झालेल्या वादामुळे ते कमालीचे दुखावले गेले होते. लातुरचं विभागीय कार्यालय नांदेडला हलवण्याच्या कारणामुळे विलासरावांना त्यांचे गुरू शंकरराव चव्हाण यांच्या मुलाशी व राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी भांडावं लागलं आणि त्यामुळेच ते विलक्षण अस्थिर झाले होते. पण शेवटी ते विलासरावच होते.सारी राजकीय मतभेदांची किल्मिषं बाजूला ठेवून ते नांदेडला अशोकरावांच्या घरी पोहोचले आणि त्या वादावर पडदा पडला.असे हे विलासराव राज्यातल्या प्रत्येकाला आपले वाटायचे. आजकाल कुठलंही साधारण पद मिळालेला पुढारी आलेले फोन स्वत: उचलत नाही, PA ला देतात पण विलासराव आपले वाटायचं कारण, ते राज्याच्या कानाकोप-यातून आलेला प्रत्येक फोन घ्यायचे आणि जमलं नाही तर काही वेळानं त्याला नंतर संपर्क साधायचे.मी पाहिलेल्या राजकीय नेत्यांपैकी मा.शरद पवार साहेब, विलासराव, गोपीनाथराव मुंडे आणि काही प्रमाणात प्रमोदजी महाजन ही अशी काही मंडळी आहेत. ज्यांनी राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. समोर आलेल्या प्रत्येक नेत्याला, कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य जनतेला शेवट पर्यंत Accessible असणारी ही माणसं राजकारणाची चौकट मोडून जनतेशी नाळ जोडू शकली हिच त्यांची खरी Credibility होती. म्हणूनच ही मंडळी कायमच ‘लोकनेते’ या पदावर आरुढ राहिली.केवळ राजकीयच नाही तर राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, कृषी-कला-क्रिडा अशा विविध क्षेत्राची विलासराव जाण ठेऊन होते. त्यांचा सर्व क्षेत्रातला सहज वावर हे त्याचं कारण होतं. म्हणूनच ते सर्वाना आपलेच वाटत.शेवटच्या काही दिवसात विलासराव दिल्लीत होते, केंद्रीय विज्ञान प्रसारण आणि अखेरीस ग्रामविकास खात्याचे ते मंत्री होते. खरंतर त्यांची अकाली एग्झिट काळजाला चिरणारी होती, रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झालेले विलासराव परत कधीच आले नाहीत. आला तो त्यांचा पार्थिव देह. विलासराव गेले तेव्हा लातुरकरांनी सुतक पाळलं होतं, देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग आणि कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीसारख्या VVIP लोक बाभळगावला त्यांच अंतिमदर्शन घेण्यासाठी आले होते. आणि यावरूनच त्यांच्या नेतृत्वाची उंची आपण समजू शकतो.मराठवाड्यासारख्या मागास भागातून आलेल्या, राज्याचं मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळलेल्या, अनेक राजकीय आणि अराजकीय संकटावर मात करत राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणा-या आभाळाएवढ्या नेतृत्वालामाजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!