थंडी, प्रदुषणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

1 min read

थंडी, प्रदुषणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. दिल्लीत तिसरी लाट आलेली आहे.

मुंबई - थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. दिल्ली, केरळ, मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्याभरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन केंद्राने केले आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. लोकांनी बेफिक्री दाखवली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळे मोठी गर्दी करू नका. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. देशात प्रामुख्याने शहरी भागांमध्ये तुलनेत जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रहिवाशांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, असे निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी असले तरी, प्रादुर्भाव थांबवण्यासाठी किंचितही करोनाची लक्षणे दिसली तरी चाचणी करून घेतली पाहिजे. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी होत असून आरोग्यसुविधाही उपलब्ध आहेत, असे पॉल यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. दिल्लीत तिसरी लाट आलेली आहे. राजधानीत उपचाराधीन रुग्णांची संख्या महिन्याभरात २६ हजारांवरून ३३ हजारांवर गेली आहे. केरळमध्ये ती ७७ हजारांवरून ८६ हजारांवर पोहोचली आहे. मणिपूरमध्ये रुग्णसंख्या २ हजारांवरून ३२००वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.