काँग्रेस कृषी विधेयकाच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत.

1 min read

काँग्रेस कृषी विधेयकाच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत.

कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. सोनिया गांधी यांची सल्लागार समिती,पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी काँग्रेसने पन्नास दिवसांसाठी देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली.

नवी दिल्ली : कृषी विधेयकाच्या विरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. सोनिया गांधी यांची सल्लागार समिती, पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी यांच्या बैठकीत 21 सप्टेंबर रोजी काँग्रेसने पन्नास दिवसांसाठी देशव्यापी आंदोलनाची रुपरेखा निश्चित केली. आज सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या मोठे नेत्यांच्या पत्रकार परिषदा होणार आहेत.

आज सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये पत्रकार परिषदा पार पडल्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक राज्यांमध्ये काँग्रेस नेते राजभवनापर्यंत पदयात्रा काढत राष्ट्रपतींच्या नावे राज्यपालांना निवेदन देणार आहेत. असं सांगण्यात येत आहे की, 2 ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात येईल आणि 10 ऑक्टोबर रोजी प्रत्येक राज्यात शेतकरी परिषद भरवण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते 31 ऑक्टोबरपर्यंत गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवतील. या मोहीमेदरम्यान पक्षाने 2 कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. या मोहीमेत घेण्यात आलेल्या सर्व स्वाक्षऱ्या 14 नोव्हेंबरला राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्याचं धोरण पक्षाने आखलं आहे.

पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलनाला सुरुवात

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉरपोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.