पुन्हा कोरोना आणि कोविड उपाययोजना-डॉ.दिवाकर कुलकर्णी

कोरोना विषाणुचे निर्मूलन शक्य नसल्यामुळे नियंत्रण हाच एक उपाय उरतो.

पुन्हा कोरोना आणि कोविड उपाययोजना-डॉ.दिवाकर कुलकर्णी

महाराष्ट्र आणि इतर काही राज्यात कोरोनाविषाणुचा दुसरा प्रादुर्भाव स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी मृत्यूदर पहिल्या लाटेपेक्षा पुष्कळच कमी असला तरी योग्य उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणुचे निर्मूलन शक्य नसल्यामुळे नियंत्रण हाच एक उपाय उरतो.

विषाणू शास्त्राचा अभ्यासक म्हणून मी जेंव्हा चिंतन करतो तेंव्हा स्वच्छ आणि स्पष्ट चित्र समोर येत नाही. मनाच्या एका कप्प्यात रोगाबद्दल भीती आणि दुसऱ्या कप्प्यात कोणतीही उपाययोजना न करण्याची बेधडक प्रवृत्ती असा मानवी विरोधाभास (मास्क वापरण्यापासून ते लसीकरणापर्यंत) सर्वत्र दिसत आहे. शासकीय पातळीवर सुद्धा सूचना आणि अंमलबजावणी या दोन्ही कृतींचा हवा तेवढा समन्वय दिसत नाही. वैद्यकीय पातळीवर तर शासकीय व खाजगी रुग्णालये आणि खाजगी प्रॅक्टिशनर्स यापैकी प्रत्येक जण आपापल्या परीने जसे जमेल तसे उपचार करत असल्याचे दिसते. यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे आणि एसओपी आहेत का आणि असलीच तर कुठे आहेत याबद्दल संभ्रम वाटतो.

लसीकरण: लस उत्पादनात भारताने सुरवातीलाच वरचा क्रमांक पटकावला, पण जेथे इंग्लंड व अमेरिका या दोन देशातील व्यापक लसीकरणाच्या उपयोगाने तेथील रोग्यांच्या संख्येत अनुक्रमे बारापट व पाचपट घट झाली तेथे भारतात मात्र संथ लसीकरणामुळे कोरोना रोगी जवळपास रोज ४५ हजार या गतीने वाढताना दिसत आहेत. यातील ८५% रोगी फक्त सहा राज्यात आहेत. लसीकरणानंतर रोग प्रसार कमी होतो हा महत्त्वाचा उपयोग (लसीकरणानंतरही कोरोना आजार का व्हावा हा वादग्रस्त मुद्दा या चर्चेपुरता बाजूला ठेवू या) धोरणात्मक दृष्ट्या विचारात घ्यावयास हवा. त्यासाठी ज्या राज्यात (आणि ज्या जिल्ह्यात) कोरोना विषाणुग्रस्त जास्त पॉझिटिव येत आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त लसीकरण (सर्व वयोगटांसाठी) करण्यावर भर द्यावयास हवा.

वयाचा व रोगप्रसाराचा संबंध आणि वयाचा व मृत्युदराचा संबंध याची थोडी गल्लत होते आहे. बाजारात, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी फिरणारी जास्त माणसे ही १५-६० या वयोगटातील असतात साहजिकच त्यांच्यामार्फत (फारशी लक्षणे दिसत नसली तरी) रोगप्रसाराची शक्यता जास्त असते नेमके त्यांनाच आपण लसीकरणापासून दूर ठेवले आहे. मात्र जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यापैकी ६०+/ कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्युदर इतरांपेक्षा जास्त आहे हेही तितकेच खरे!

एक रोगी किती माणसांना रोग प्रसार करू शकतो यास आर फॅक्टर म्हणतात. भारतात सर्वसाधारणपणे हा आर फॅक्टर १.५ असला तरी महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ५ एवढा जास्त आहे. तर गुजरात व मध्यप्रदेश मध्ये हा आर फॅक्टर ३ आहे.
सुरवातीस साठ वर्षांवरील लसीकरणाचे धोरण योग्य होते, मात्र त्यानंतर वयाच्या निकषांपेक्षा आर फॅक्टर जास्त असलेल्या भागांमध्ये लसीकरणावर भर द्यावयास हवा होता. म्हणजे आर फॅक्टर कमी होणे व त्या अनुषंगाने दूरवर रोग प्रसाराची शक्यता कमी करणे हा उपाय योग्य ठरला असता. दुर्दैवाने केंद्रात आणि आर फॅक्टर ५ असलेल्या दोन्ही राज्यात लसीकरणाचा वेग हवा तेवढा वाढलेला दिसत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. १३९ कोटींच्या देशात देशव्यापी लसीकरण करण्यासाठी लागणारे डोस, त्यासाठी लागणारा वेळ व रोगप्रसाराची गती यांचे त्रैराशिक समीकरण पाहता या धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. रोगप्रसार जास्त असलेल्या सहा राज्यात संपूर्ण लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे लक्ष साध्य करण्यासारखे आहे. तेवढे सहकार्य जनकल्याणार्थ शासकीय पातळीवर झाले पाहिजे.

पुन्हा पुन्हा टाळेबंदीची धमकी देणे हा उपाय यशस्वी ठरत नाही हे लक्षात आल्यावर तरी अशा प्रकारचा विचार सरकारांनी करू नये. जेवढ्या आग्रहाने मास्क वापरणे, गर्दी न करणे आणि दूर अंतरावरून संपर्क करणे याचा प्रचार केला गेला तेवढ्याच आग्रहाने लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे याचीही आवश्यकता आहे.

लसीकरणाची उपयुक्तता: लसीकरण झाल्यानंतरही काहींना कोरोनाची बाधा झाल्याचे ऐकू येत आहे. यावर सामान्य प्रतिक्रिया अशी असते की मग लस कशासाठी घ्यायची? कोणतीही लस लोकसंख्येच्या ७०-८० टक्केच काम करते कोविशील्डचा पूर्ण डाटा उपलब्ध नसला तरी तिची कार्यक्षमता ६०-७० टक्के याच्यापेक्षा जास्त नसावी. साहजिकच काहीजणांना लस घेतल्यावरही कोरोनाची बाधा होणे शक्य आहे मात्र लसीकरणानंतर जी प्रतिकारशक्ती तयार झाली आहे तिच्यामुळे रोगाची तीव्रता खूप कमी असेल आणि मृत्यूची शक्यता जवळपास नसेल त्याशिवाय लसीकरणानंतर विषाणू प्रसार करण्याची शक्ती क्षीण झाल्यामुळे रोगप्रसारास प्रतिबंध होईल. या दोन महत्त्वाच्या कारणांसाठी तरी प्रत्येकाने शक्य तेवढ्या लवकर लसीचे दोन्ही डोस शासकीय सूचनेप्रमाणे तेवढ्या ठराविक अंतराने घेणे आवश्यक आहे.

कोरोना पॉझिटिव्हिटी आजार आणि उपचार:
अ. कोणत्याही कारणाने टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली पण काहीही लक्षणे नाहीत - अशांनी फक्त ७-१० दिवस विलगीकरणात घरीच राहावे आणि आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. योग्य आहार घ्यावा व स्वतःचे व्यायामासारखे नैमित्तिक कर्म चुकवू नये.

ब. वय वर्षे ६०च्या आतील व्यक्तींनी सर्दी-पडसे झाले म्हणून टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह आली - अशांनी घाबरून न जाता थर्मामीटरने स्वतःचा ताप नियमित तपासावा, त्याची नोंद करावी व कोणत्याही स्पेशालिस्टकडे न जाता आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा व सर्दी पडशासाठी जी नेहमीची औषधयोजना असेल ती करावी. अनुभव असा आहे की असे पेशंट तीन-चार दिवसात पूर्ण बरे होतात. या पूर्ण काळात (किमान १० दिवस) विलगीकरणात घरीच राहावे आणि आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. योग्य आहार घ्यावा व झिंक, व्हिटॅमिन अ, ब, क, ड, ई वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावे. तीन चार दिवस हळद व आयुर्वेदिक उपचारही घेण्यास हरकत नाही. उगीच घाबरून जाऊन अँटी वायरल ट्रीटमेंट सुरू करण्यास डॉक्टरांना भाग पाडू नये.

क. या दोन प्रकारांव्यतिरिक्त घसा जास्त दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे अशासारख्या केसेस मध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार पद्धती अवलंब करावी. कोणाचाही अनधिकृत, घरगुती सल्ला ऐकू नये.

टेस्ट करावयाची असेल तर शक्यतो घरातल्या सर्वांनी एकदम टेस्ट करावी आणि जेवढे पॉझिटिव निघतील तेवढ्यांचे विलगीकरण करावे. तीन पॉझिटिव्ह व एक निगेटिव्ह निघाल्यास निगेटिव्हला वाचवण्यासाठी त्याला वेगळे ठेवावे.

  • ज्यांना काही आजार नाही (६५+ सहित) त्यांना सूचना ही की आजाराला निमंत्रण देऊ नका-
  • कुणाकडेही, कोणत्याही कारणासाठी जाऊ नका. कोणालाही घरी बोलावण्याचे टाळा.
  • कोणी कितीही जवळची व्यक्ती कशीही, कितीही आजारी असली तरी शक्यतो भेटावयास जाणे टाळा.
  • फक्त घरातील एका माणसाने रिस्क घेत बाहेरची आवश्यक कामे करावीत हे करतांना डोळ्यांवर चष्मा/गॉगल आणि पूर्ण, चांगल्या प्रतिचा मास्क/ मोठा रुमाल/ गमछा नाकातोंडावर बांधावा आणि बाहेर कुठेही काढू नये. यादरम्यान मोबाईल चा वापर कमीत कमी करावा व रस्त्यावर खाणे पिणे टाळावे.
  • पॅनिक होऊ नका, धीर सोडू नका. घरातल्या सगळ्यांना सांभाळा.
  • अफवांवर विश्वास ठेवू नका, व्हाटसप मेसेज रिलाएबल सोर्सकडून असल्याशिवाय खरा समजू नका, पुढे तर मुळीच फॉरवर्ड करु नका.
  • पाणी, सरबत, ग्रीनटी द्रव पदार्थ भरपूर प्या,
  • खाण्यापिण्याची हयगय करु नका. फळे भाज्या खा. नियमित व्यायाम करा.
  • महत्त्वाचे म्हणजे लस घ्या, दुसरा डोस ही चुकवू नका. इतरांनाही लस घेण्यासाठी उद्युक्त करा.

आपण सर्वजण हे संकट टाळण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करून निगेटिव्ह राहू या.

**डॉ दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर **

(निवृत्त विषाणुशास्त्रज्ञ
रंगनाथनगर परभणी)
ddkulkar@gmail.com


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.