कोरोना तपासणीचा मराठवाड्यासह महाराष्ट्रात खेळखंडोबा, रुग्ण संख्या कमी दाखवण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रताप-आ.बबनराव लोणीकर

1 min read

कोरोना तपासणीचा मराठवाड्यासह महाराष्ट्रात खेळखंडोबा, रुग्ण संख्या कमी दाखवण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रताप-आ.बबनराव लोणीकर

जालना जिल्हा आरोग्य विभागाची धक्कादायक आकडेवारी, रुग्ण संख्या कमी दाखवण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रताप. 433 रुग्णांच्या कोरोना तपासणीत 01 रुग्ण पॉझिटिव्ह. मुजोर प्रशासनासह दोषींवर कार्यवाही करा, अन्यथा विधानसभा, विधानपरिषदेचे कामकाज चालू देणार नाही- आ.बबनराव लोणीकर

जालना: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू केला असून 12 लाख 50 हजार पेक्षा अधिक सदोष असणाऱ्या आर.टी.पी.सी.आर किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदी मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला होता. त्यानंतर देखील प्रशासन मुजोर झालं असून आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीची देण्यात आलेली आकडेवारी धक्कादायक व कोरोनाबाबत जगातील पहिलं आश्चर्य असल्यासारखी आहे.

कोरोना संसर्गाच्या कालावधीदरम्यान अँटीजन आणि आरटीपीसीआर अशा दोन प्रकारच्या चाचण्या प्रामुख्याने केल्या जातात. त्यातील अँटीजन चाचणी केल्यानंतर प्रमुख्याने 6 ते 15 टक्के पर्यंत खात्रीशीर निदान होते. परंतु आरटीपीसीआर या चाचणीमध्ये 30 टक्के खात्रीशीर निदान केले जाते. त्यासाठी 12 लाख 50 हजार किट्स खरेदी करण्‍यात आल्या आहेत. परंतु नव्याने खरेदी करण्यात आलेल्या या किटमध्ये अनेक दोष आढळून आले आहेत. याबाबत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती.

त्यानंतर जालना जिल्ह्यातील आरोग्य विभागाने लोणीकर यांना दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी पाठवलेला अहवाल धक्कादायक आहे. आरोग्य विभागाच्या दृष्टीने जवळपास कोरोना प्रादुर्भाव संपलेला आहे असं दर्शविण्यात आले आहे. जालना जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दिलेल्या आकडेवारीनुसार 433 कोरोना बाधितांची तपासणी केली असतात केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 432 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे.

आरोग्य विभागाने 433 पैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह दाखवल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकारला केवळ आपली इज्जत वाचवण्यासाठी रुग्ण संख्या कमी दाखवायची आहे काय? असा सवाल यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे. ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ते रुग्ण बिनधास्तपणे समाजामध्ये फिरत आहेत. त्यांच्यामुळे इतर अनेक लोक कोरोना बाधित होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाने चालवलेला हा आकड्यांचा खेळ लोकांच्या जीवावर बेतणार आहे. त्यामुळे आशा सदोष असणाऱ्या किट्स आणि त्यामध्ये दोषी असणारे अधिकारी खरीददार विक्रेते या सर्वांवर कठोरातील कठोर कार्यवाही करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आक्रमक आंदोलन करून शासन व प्रशासनाला जाब विचारला जाईल असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कोरोना सारखे गंभीर संकट असताना अशा परिस्थितीत जनसामान्यांच्या आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी नसून. या सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचा पुनरोच्चार करत. संबंधितांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.