देशात कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ, २४ तासात आढळले २७१० नवीन रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २७१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे शेवटच्या दिवशी २२९६ रुग्ण कोरोनातून बरे झाले. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे १५,८१४ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले होते. गुरुवारी १५,४१४ सक्रिय रुग्ण नोंदवण्यात आले. गुरुवारी देशात कोरोनाचे २६२८ नवीन रुग्ण आढळून आले होते तर १८ जणांचा मृत्यू झाला.

राजधानी दिल्लीत कोरोनाचे ४४५ नवीन रुग्ण आढळले आहेत, सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राजधानीत पॉझिटिव्हिटी रेट २.०४% आहे. तज्ञ म्हणतात की जेव्हा पॉझिटिव्हिटी रेट ५% पेक्षा जास्त होतो तेव्हा परिस्थिती गंभीर बनते. सध्या दिल्लीत कोरोनाचे १६२७ सक्रिय रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रात कोरोनाचे ५३६ नवे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५६८ आहे.

देशातील कोरोना रिकव्हरी रेट ९८.७५% वर पोहोचला आहे. मागील दिवसाप्रमाणे पॉझिटिव्हिटी रेट ०.५८% वर होता. देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेबद्दल सांगायचे तर, गेल्या २४ तासांत १४ लाख ४१ हजार ७२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण लसीकरण १९२.८२ कोटी (१,९२,८२,०३,५५५) पेक्षा जास्त झाले आहे. भारतात आतापर्यंत एकूण ५ लाख २४ हजार ५३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Share