सुमित दंडुके / औरंगाबाद : देशात १६ जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे.
बुधवारी दि.१३ रोजी सकाळी कोरोनाच्या ६४ हजार लसी औरंगाबाद शहरात दाखल झाल्या आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मधून मंगळवारी लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागात रवाना झाले. पुण्याहून पहाटे ५ वाजता व्हॅक्सीन व्हॅन निघाली होती ती सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी औरंगाबादेत पोहोचली.
वाहन चालक संजय चाबुकस्वार आणि आरोग्य पर्यवेक्षक शेखर आनंदे यावेळी सोबत होते. सिडको एन-५ येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात या लसी ठेवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ जिल्ह्यांचा साठा उतरविण्यात आला. येथून जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीचा साठा आजच पाठवला जाणार आहे.