विजय कुलकर्णी /परभणी : जगभरात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेल्या कोरोना विषाणुला अटकाव करणारी लस सध्या उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रसह मराठवाड्यातही ही लस दाखल झाली असून औरंगाबाद पाठोपाठ आता परभणीतही कोविड-१९ ची लस आली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन लसीकरणाची सर्वतोपरी तयारी करीत आहे.
सर्व प्रथम आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना कोविड लस देण्यात येणार असून दि.१६ पासून तीन ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहीती आहे. १) परभणी जिल्हा रुग्णालय, २) सेलू उपजिल्हा रुग्णालय तसेच ३) परभणी शहरातील जायकवाडीतील मनपा रुग्णालयात शनिवारपासुन लसीकरणास प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी-कर्मचार-यांना कोविडची लस देण्यात येणार आहे. ९ हजार ५०० कोविड लसीचे डोस सायंकाळी ७ वाजेला परभणीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, शासकीय व खासगी वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोनायोध्यांचा पहिल्या टप्यात समावेश करण्यात आला असल्याची माहितीही डॉ. नागरगोजे, डॉ. सुरवसे यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी कोव्हिड लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी कोव्हिड लसचे ९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत.
दरम्यान परभणीतही सुरूवातीला कोरोना रूग्णांची संख्या मोठया प्रमाणावर झाली होती. या साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभा करण्यात आले होते. विविध ठिकाणी कोविड रूग्णांनी उपचार घेतला होता. मागील काही दिवसात रूग्णांची संख्या रोडावली होती. त्यानंतर खाजगी कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या साथीने जगभरात डोके वर काढले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जात होती. आता औरंगाबाद वरून ही लस परभणीत दाखल होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग या लसीकरणासाठी सज्ज झाला आहे.