हिंगोलीः जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक १ मार्च ते ७ मार्च दरम्यान संचारबंदी आदेश लागू केले आहेत. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यक्तींना संचार करण्यास प्रतिबंध लागू असेल, शिवाय जी व्यक्ती हा नियम मोडेल त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाविषाणू प्रादुर्भाव वाढू लागला असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायद्याअंतर्गत विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचार बंदी आदेश लागू केले आहेत. दिनांक १ मार्च ते ७ मार्च दरम्यान हे आदेश लागू राहतील.
यादरम्यान दूध विक्री केंद्र विक्रेते यांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील,जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँक यांचे कामकाज चालू राहील. या कालावधीमध्ये सर्व धार्मिक स्थळे सर्व शाळा महाविद्यालय मंगल कार्यालय बंद राहतील. या कालावधीत औषधे दुकाने चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांचे पत्रकार,कार्यालयीन कर्मचारी यांना मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गची कामे तसेच आरोग्य व शासकीय विभागांशी संबंधित बांधकामे, महावितरण व इतर विद्युत विषयक विभागाकडील दुरुस्तीची कामे, जलसंधारण विषय कामे यांना परवानगी देण्यात आलेली आहे. शिवाय यासाठी लागणारी वाळू उत्खनन करण्यास मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषीसेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहतील.
या कालावधीमध्ये बाहेरील विद्यार्थी व जिल्ह्यात अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळ हॉटेल केवळ पार्सल सुविधासाठी सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असेल, असे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले असून यादरम्यान सर्व व्यक्तींना सामाजिक आंतर राखून मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस कायद्यानुसार कारवाईस सामोरे जावे लागेल असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.