प्रदुम्न गिरीकर/हिंगोली: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक १ मार्च ते ७ मार्च दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यक्तींना संचार करण्यास प्रतिबंध लागू असेल, शिवाय जी व्यक्ती हा नियम मोडेल त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेत.
1 मार्च ते 7 मार्च दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी लागू आहे. याच पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तब्बल एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस स्थानकाचे ठाणेदार बळीराम बंदखडके यांच्या पथकाने जवळा पळशी मार्गावर असलेल्या आरा मशीन जवळ दुचाकीवरून देशी दारूच्या 90 बॉटल अवैधरित्या घेऊन जात असताना मदन काळे रा. खंबाळा यास रंगेहात पकडले. यामध्ये सात हजार दोनशे रुपयांच्या देशी दारू साठा व तीस हजार रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या कारवाईमध्ये कारवाडी फाट्याजवळ कचरू चव्हाण रा. पारधी वाडा व सुनील रणदिवे रा. न.प. कॉलनी हिंगोली या दोघांना ऑटो मधून देशी दारूच्या 576 बॉटल घेऊन जाताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमध्ये 46 हजार रुपयाचा अवैध देशी देशी दारू साठा व 86 हजार रुपयांचा ऑटो जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये ग्रामीण पोलिस ठाण्याचे शेख मोहम्मद, रवी हरकळ, धामणे, वाठोरे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.