संचारबंदी हटेना!उपासमार थांबेना! चालकाची पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या.

1 min read

संचारबंदी हटेना!उपासमार थांबेना! चालकाची पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या.

प्रशासन झोपेचे सोंग घेऊन नाटकी वेशात

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: मागील पाच महिन्यापासून सुरू असलेल्या संचारबंदीस हटवले जात नाही. मुलांच्या शिक्षणासह उपासमार डोळ्यासमोर उभी आहे. या सर्व प्रश्नाने वैतागून एका ड्रायव्हरने विटा(बु.)येथील गोदावरी पात्राच्या पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पाथरी तालुक्यातील विटा(बु.)येथे घडली. या घटनेने गावात सगळीकडे हळहळ पसरली आहे.
पाथरी तालुक्यातील विटा(बू.)येथील तुकाराम महादु तुपसमिंदर हा युवक पाथरी-सोनपेठ या मार्गावर प्रवाशी गाडीवर चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवायचा. मिळणाऱ्या पैशातून तो कुटुंबाचा गाडा ओढत घरप्रपंच चालवत असे. मात्र मागील पाच महिन्यापासून कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचाबंदीने हातचा रोजगार गेला. यातच मुलांची शिक्षण आणि घर कसे चालवावे असा प्रश्न समोर उभा असताना. पुन्हा पुन्हा संचारबंदी होऊन उपासमार होण्याची चिन्हे समोर दिसल्याने तुकाराम याने दि.१६ रविवार रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोदावरी पुलावरुन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे .या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून संचारबंदीतील प्रश्नाचा पहीला बळी गेल्याची चर्चा होत आहे. दरम्यान तुकाराम याच्या पाश्चात आई,वडील,दोन भाऊ,एक बहीण,चार मुले,पत्नी असा परिवार आहे.
प्रशासन झोपेचे सोंग घेऊन नाटकी वेशात
या घटनेची माहिती गावातील सामजिक कार्यकर्त्यांनी पाथरीचे तहसिलदार सुभाष कट्टे,सहाय्यक पोलिस निरीक्षक तिप्पलवाड यांच्यासह बिट जमादार गणेश फड यांना दिली होती. मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नव्हता रात्री ११ वाजेपर्यंत तलाठी मिलिंद विटेकर वगळता कोणीही घटनास्थळाकडे फिरकले नव्हते,या घटनेची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर,जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना देताच त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पावले उचलले. मात्र पाथरीच्या स्थानिक प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यानेच आणि अवैध व्यवसायांना बळ दिले जात असल्यानेच गुन्हेगारी वाढत असून यातून निर्माण होणाऱ्या व्यसनाधिन्नतेतून आत्महत्या झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यात अवैध वाळू उपशात मिळणाऱ्या पैशातून व्यसनाधिन्नता निर्माण होत असल्याचीही अनेक उदाहरणे गोदाकाठी पाहायला मिळतील.