"हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुंगळे नाही"
 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1 min read

"हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुंगळे नाही" – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘आम्ही गुळाला मुंगळा कसा चिटकतो तसे नाही. दसरा मेळावा टार्गेट करायला नाही, पाठीत वार केलात तर कोथळा काढणार.’

सुमित दंडुके : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा खंडीत झाली. सोशल डिस्टस्टिंगचे सर्व नियम पाळत दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, हे सरकार लवकरच पडेल असे म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुंगळे नाही असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार घणाघात केला. ज्यांना आमच्याशी टक्कर द्यायची खुमखुमी असेल त्यांनी अंगावर यावं आम्ही त्यांना दाखवून देऊ असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता दिलं. हिंदुत्वाची व्याख्या आम्हाला सांगणाऱ्यांनी मोहन भागवत यांनी दिलेलं भाषण ऐकावं असंही त्यांनी भाजपला सुनावलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही गुळाला मुंगळा कसा चिटकतो तसे नाही. दसरा मेळावा टार्गेट करायला नाही. कोरोनाची लस बिहारला मोफत देणार पण काहीना येथे मोफत लस देण्याची गरज असते. आज मी मास्क बाहेर काढून बोलणार, सीएम म्हणून नाही. त्यामुळे कदाचित संयम सुटला तर समजून घ्या. ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांनी टक्कर द्यावी त्यांना दाखवून देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण सरकार पाडण्याचे स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवल्या शिवाय राहणार नाही. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होत असते याचे इतिहासात दाखले आहेत. ‘ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.
जीएसटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर साधला निशाणा. जीएसटी करपद्धत ही फसवी असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेच जीएसटी प्रणाली फसलेली असेल तर जुनी करपद्धती आणा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.