भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं निधन, मोदींसह अनेक नेत्यांच्या शोक संवेदना

1 min read

भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं निधन, मोदींसह अनेक नेत्यांच्या शोक संवेदना

भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांच्या नावात त्यांचा समावेश होतो. जसवंत सिंह यांनी राज्‍यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात भाजपचं प्रतिनिधित्व केलं. वित्तमंत्री असताना त्यांनी स्‍टेट व्हॅल्‍यू अॅडेड टॅक्‍स (VAT) ची सुरुवात केली होती.

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. राजस्थानच्या बडमेरचे जसवंत सिंह यांनी वित्त, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी जसवंत सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

भारतीय सैन्यदलात काम केल्यानंतर जसवंत सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांच्या नावात त्यांचा समावेश होतो. जसवंत सिंह यांनी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात भाजपचं प्रतिनिधित्व केलं. वित्तमंत्री असताना त्यांनी स्टेट व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) ची सुरुवात केली होती, ज्यामुळं अनेक राज्यांना महसूल मिळू लागला होता. त्यांनी कस्टम ड्यूटी देखील कमी केली होती.

2014 साली भाजपनं जसवंत सिंह यांना लोकसभेचे तिकिट दिले नव्हते. नाराज झालेल्या जसवंत सिंहांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याच वर्षी त्यांना दुखापत झाली आणि ते कोमात गेले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी 1996 ते 2004 दरम्यान संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,'जसवंत सिंह यांनी आधी एक सैनिक म्हणून आणि नंतर राजकारणात येऊन बराच काळ देशाची सेवा केली. अटलजींच्या काळात त्यांनी वित्त, सरंक्षण यासारख्या महत्वाच्या विभागांची धुरा सांभाळली आणि जगभरात भारताची मान उंचावली. त्यांच्या निधनानं दुखी झालं आहे', असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.'