कर्जबाजारी मुलाने केली स्वतःच्याच घरात चोरी..!

1 min read

कर्जबाजारी मुलाने केली स्वतःच्याच घरात चोरी..!

टपरी चालकाने पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने दिनेशने मित्रांच्या मदतीने सोनं, चांदी ,रोख रक्कमेसह पावणे दोन लाखांची आपल्याच घरी चोरी केली.

सुमित दंडुके / औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने मुलानेच आपल्या घरात मित्राच्या मदतीने चोरी केल्याची खळबळजनक घटना शहरातील रेणुकानगर भागात रविवारी(दि.१५) रोजी घडली. चोरलेलं सोनं मन्नपुरम गोल्ड येथे ठेऊन पैसे ही उचलले. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून चोरीचा बनाव करत पोलिसांत तक्रारही दिली.
रेणुकानगर येथील रहिवासी उषा देविदास शिंदे ह्या दिवाळीनिमित्त त्यांच्या पतीसोबत गावी गेल्या होत्या. त्यांचा मुलगा दिनेश हा एकटाच घरी होता. दुपारच्या वेळी मुलगाही घराला कुलूप लावून गावाकडे गेला. त्यानंतर काही तासांनी शेजारच्यांनी उषा शिंदे याना फोन लावून तुमच्या घरी चोरी झाली असल्याची माहिती दिली. तेव्हा घरी येऊन बघितले तर घरातून सोनं, चांदी ,रोख रक्कमेसह पावणे दोन लाखांची चोरी झाली असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत चौकशी सुरु केली त्यातून त्यांचा मुलगा दिनेश हा कर्जबाजारी आणि व्यसनाधीन असल्याचं पोलिसांना कळाले. त्यावरून मुलाला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदरील गुन्हा आपणच आपल्या दोन मित्रांच्या मदतीने केली असल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपी दिनेश देविदास शिंदे(वय.२३,), सुमित गुलाबराव प्रसाद(वय.२१), आणि कृष्णा साहेबराव लघाने(वय.२४) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दिनेशने घरातील सोनं, चांदी ,रोख रक्कमेसह पावणे दोन लाखांची चोरी केली आणि घरातलं सामान अस्ताव्यस्त फेकलं, दाराचं कुलूप तोडून आपल्या घरात चोरी झाल्याचा बनाव केला.आणि गावी निघून गेला. शेजाऱ्याचा फोन आला तेव्हा आई सोबत पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठीही गेला. या घटनेमुळे त्याच्या घरच्यांनाही मोठा धक्काच बसला आहे.
सदरील घटनेचा तपास पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सपोनि घनश्याम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर.के.मुळे आणि सहकारी यांनी केला.