मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ मुस्लीम आरक्षणाची मागणी

1 min read

मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ मुस्लीम आरक्षणाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचा सल्ला सरकारला दिला. त्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही समोर येत आहे.

मुंबई : मराठा आरक्षणा पाठोपाठ मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुढे येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश देखील काढावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचा सल्ला सरकारला दिला. त्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही समोर येत आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ मुस्लीम आरक्षणाचीही मागणी होत आहे.

मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून याबाबतची मागणी केली आहे. २०१४ मध्ये राज्य सरकारने मराठा समाजासह मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्षणामध्ये मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण कायम ठेवले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबरोबर मुस्लीम आरक्षणाचाही विचार करत अध्यादेश काढावा अशी मागणी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केलीय. या मागणीचे एक पत्र मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण यांना पाठवण्यात आले आहे.