सातारा : मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अँडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही ऍडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उद्यनराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी मत व्यक्त केले. याआधीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र असं झालं नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यासह काही नेत्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी आरक्षण प्रश्नावर त्यांनी चर्चा केली. “मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अँडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा” असं उदयनराजे म्हणाले.