नवसाच्या मोदकांना भाविक मुकणार

1 min read

नवसाच्या मोदकांना भाविक मुकणार

प्रसिद्ध चिंतामणी गणपतीचा वार्षिकोत्सव रद्द, हिंगोली येथील प्रसिद्ध चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे.

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: हिंगोली येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेला चिंतामणी गणपतीचा यावर्षीचा वार्षिकोत्सव कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी नवसाचे मोदक देखील वाटप केले जाणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले आहे.
हिंगोली येथील प्रसिद्ध चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी गणेश चतुर्थी स्थापनेपासून ते विसर्जनादरम्यान या गणपतीच्या दर्शनाकरिता वेगवेगळ्या ठिकाणावरून लाखो भाविक येतात. गणपतीचा नवसाचा मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
हिंगोली शहरात देखील संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने विविध देवस्थाने बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. दरम्यान आज चिंतामणी गणपती संस्थानच्या वतीने या वर्षीचा वार्षिक उत्सव रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी उत्सवादरम्यान निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत मंदिरातील धार्मिक कार्य पार पाडली जाणार आहेत. नागरिकांना गणपतीचे दर्शन मिळावे याकरिता ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देखील संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.