धक्कादायक :गळा आवळून चालकाचा खून

1 min read

धक्कादायक :गळा आवळून चालकाचा खून

दारुच ठरली कारण

प्रद्युम्न गिरीकर /हिंगोली- वसमत तालुक्यातील हट्टा येथे दोन जण दारू पीत असताना वाद होऊन एकाने दुसऱ्याचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी आज सोमवारी ताब्यात घेतले असून हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हट्टा येथील ट्रॅक्टर चालक प्रभाकर गंगाराम ठोके (44) व पिंटु उर्फ लोभाजी लोडबाजी सांगळे हे दोघे रविवारी संध्याकाळी जिल्हा परिषद शाळेच्या मागे दारू पीत बसले होते. यावेळी दारूच्या नशेत दोघात वाद झाला. या वादातून पिंटू सांगळे याने प्रभाकर ठोके यांचा गळा आवळल्याने जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पिंटू सांगळे हा घरी आल्यानंतर पत्नीला घेऊन मोटरसायकलवर परभणी जिल्ह्यातील मानवत येथे पसार झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सकाळी घटनास्थळी हट्टयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलिस कर्मचारी इरफान कादरी, नागोराव दिंडे, गणेश लेकुळे, पांडुरंग ठाकरे सचिन शिंदे यांनी भेट दिली. तसेच प्रभाकर ठोके यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मोबाईल सीडीआरनुसार हट्टा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंटु सांगळे याचा शोध सुरू केला. सांगळे याच्या भावाच्या मोबाईलवरून संपर्क करून मानवत- परभणी रस्त्यावर त्यास ताब्यात घेऊन हट्टा पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख यांनी हट्टा पोलीस ठाण्यात भेट देऊन पाहणी केली. हट्टा पोलिसांसह पिंटु सांगळे याचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवसांब घेरवारे, किशोर पोटे, पोलिस चालक प्रशांत वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. आरोपी पिंटू उर्फ लोभाजी लोडबाजी सांगळे यास ताब्यात घेण्यात आले असून खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.