धक्कादायक: तीन मूकबधिर दिव्यांगांना नऊ लोकांनी केली बेदम मारहाण

1 min read

धक्कादायक: तीन मूकबधिर दिव्यांगांना नऊ लोकांनी केली बेदम मारहाण

वैजापुर तालुक्यातील निमगाव येथील घटना

शैलेंद्र खैरमोडे/वैजापूर: औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यातील निमगाव येथील एकाच कुटुंबातील तीन मूकबधिर दिव्यांग व्यक्तींना शेजारी राहणाऱ्या 9 व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. वैजापुर तालुक्यातील निमगाव येथील गणेश वाडी शेत वस्तीवर राहणाऱ्या तीन मूकबधिर व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना लाकडाने मारहाण करून जखमी केले आहे.
या तीन मूकबधिर दिव्यांगा पैकी दोन पुरुष तर एक महिला असून या मूकबधिर महिलेला व तिच्या आईला देखील लाकडाच्या दांड्याने मारहाण करून रक्तबंबाळ केले आहे.
संगिता राजेंद्र त्रिभुवन, राजेंद्र शेषेराव त्रिभुवन व संजय शेषराव त्रिभुवन हे तिघे मूकबधिर असून हे सर्वजण आपला शेती उद्योग करणारे शेतकरी आहेत. मारहाण करणारे लोक हे या मूकबधिर दिव्यांगांच्या शेताच्या बाजूला राहत असून शेताच्या बांधावरून कुरापत काढून ही मारहाण करण्यात आली आहे.
रावसाहेब त्रिभुवन ,पंढरीनाथ त्रिभुवन ,उद्धव त्रिभुवन, सचिन त्रिभुवन सह 9 लोकांनी या दिव्यांगांना मारहाण करून जखमी केले आहे.
सदरील मारहाण विषयी या मूकबधिर दिव्यांगांनी शिऊर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून शिऊर पोलिसांनी जुजबी कारवाई करून आरोपींना मोकाट सोडून दिले आहे. मूकबधिर दिव्यांग महिलेच्या अंगावर लाकडाने बेदम मारहाण केल्याच्या अनेक रक्तबंबाळ खुणा असतानादेखील पोलिसांनी फक्त धक्काबुक्की झाल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे.
विशेष म्हणजे या आरोपीविरुद्ध सन 2016 च्या दिव्यांग हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल केला नाही.
या सर्व प्रकारामुळे राज्यातील दिव्यांगांच्या संघटनांनी निषेध व्यक्त करून आरोपीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. शैलेंद्र खैरमोडे वैजापूर