विवाहिता बेपत्ता;माहेरच्यांकडून सासरच्या मंडळींना मारहाण

1 min read

विवाहिता बेपत्ता;माहेरच्यांकडून सासरच्या मंडळींना मारहाण

विवाहिता सकाळपासून बेपत्ता झाल्याची माहिती कळताच माहेरच्या लोकांनी तिचे सासरचे घर गाठून हल्ला चढविला.

सुमित दंडुके / औरंगाबाद : विवाहित मुलगी बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्या सासरी येऊन धुडगूस घातला. मुलीच्या दिराला आणि त्याच्या आईला मारहाण केली. यात दोघे जखमी झाले आहेत. औरंगाबादमधील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली.
WhatsApp-Image-2020-11-03-at-5.53.35-PM
विवाहिता सकाळपासून बेपत्ता झाल्याची माहिती कळताच माहेरच्या लोकांनी तिचे सासरचे घर गाठून हल्ला चढविला. ही घटना सोमवारी (२ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागात घडली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर आणि जवाहर नगर ठाण्यातील पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
WhatsApp-Image-2020-11-03-at-5.31.20-PM
शिवाजीनगर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ राहणारी शिवकन्या चव्हाण ही २३ वर्षीय विवाहिता सोमवार सकाळपासून बेपत्ता आहे. ही माहिती तिच्या गेवराई तांडा येथील माहेरकडील नातेवाईकांना माहीत झाली. तेव्हा एक टेम्पो भरून लोक शिवकन्या चव्हाण हिच्या शिवाजीनगर येथील सासरच्या घरी येऊन धडकले. आमची मुलगी कोठे आहे, असा प्रश्न करत विवाहितेच्या दीर आणि त्याच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरातील लोक मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली.
या हल्ल्यात विवाहितेचा दीर अक्षय उत्तम चव्हाण आणि अक्षयची आई जखमी झाली आहे. त्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी तातडीने शहानूरमिया दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास सुरु असून लवकरच सदरील विवाहितेचा शोध घेऊ अशी पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सपोनि घनश्याम सोनावणे यांनी माहिती दिली आहे.