डॉ.राजन शिंदे खून प्रकरण; पोलीसांकडून कसून तपास सुरु

गृह कलहातून कुटूंबियांनीच खून केला असल्याचा संशय...

डॉ.राजन शिंदे खून प्रकरण; पोलीसांकडून कसून तपास सुरु

औरंगाबाद: शहरातील बहुचर्चित डॉ.राजन शिंदे खून प्रकरणाचा उलगडा दोन दिवस उलटूनही झालेला नाही. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.राजन शिंदे यांची रविवारी मध्यरात्री क्रूर हत्या झाली होती. सोमवारी घाटी रुग्णालयात त्यांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले. त्यात मारेकऱ्याने डॉ.शिंदेंवर हल्ला करताना दोन हत्यारांचा वापर केल्याचे म्हटले आहे. आता राजन शिंदे यांच्या हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिले आहे.

पोलीसांकडून कसून तपास सुरु
शिंदे यांचा खून झाला त्या रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकासह गुन्हे शाखा, मुकुंदवाडी पोलिस तपास करत होते. शिंदे यांच्या घरात पोलिसांनी अहोरात्र ठाण मांडले आहे. संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे. निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरु आहे. काल दिवसभर, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आदींवर प्रश्नांच्या फैरी झाल्या. प्रत्येकाच्या जबाबात काहीसा फरक येत आहे. पण पोलिसांच्या हाती अद्याप ठोस पुरावे लागलेले नाहीत. शिंदेंच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात पोलीसांनी शोध घेतला त्याठिकाणी हत्यारं लपविण्यात आल्याचा संशय पोलीसांना होता, परंतू तेथेही पोलीसांना काही मिळाले नाही.

डॉ.शिंदेंची अत्यंत क्रुरपणे हत्या
पोलिसांना मिळालेल्या पोस्टमॉर्टेमच्या अहवालात खून किती क्रूरपणे करण्यात आला हे उघड झाले आहे. मारेकऱ्याने दोन हत्यारांचा वापर केला. त्यातील एक हातोडा किंवा लोखंडी रॉडसारखे होते. त्यातील लोखंडी रॉडचा एक तडाखा डोक्याच्या मागील बाजूला केला, तर कपाळावर तीन घाव घातले. हा तडाखा व घाव शक्तीनिशी डॉ. शिंदेंना प्रतिकार करणे कठीण गेले असावे. त्यानंतर मारेकऱ्याने धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या कानाचा काही भाग कापला. मग गळा मणक्यापर्यंत म्हणजे दीड ते पावणेदोन इंच खोलवर चिरला. त्यामुळे डॉ.राजन यांना ओरडणेही शक्य झाले नसावे. अहवालानुसार चार ते पाच सेंटिमीटर खोलवर वार करत हाताच्या नसा कापण्यात आल्या. एखादी लोखंडी, लाकडी वस्तू कापण्यासाठी वापरले जाणारे हे धारदार हत्यार असावे. आता दोन्ही हत्यारे शोधणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

पत्नीने केलेल्या बदलीच्या मागणीने सगळेच चक्रावले
डॉ. शिंदे यांच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नी मनीषा यांनी मुलीसह विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांची भेट घेतली. मनीषा या विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात प्राध्यापिका आहेत. तेथून औरंगाबाद विद्यापीठात बदली करण्याची मागणी त्यांनी कुलगुरुकडे केली. या भेटीनंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ.शिंदे यांचा खून झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने केलेल्या या बदलीच्या मागणीमागील हेतू काय असेल, या विचाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

संशयाची सुई कुटुंबियांकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.शिंदे यांच्या घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते. घरात त्यांच्यासह पत्नी, दोन मुले आणि आई-वडील होते. घरातील एकही वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेही तोडण्यात आलेले नाहीत. डॉ. शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर पोलिसांना तत्काळ कळविले नाही. पोलीस येण्यापूर्वीच हॉलमध्ये सांडलेले रक्त पुसून घेण्यात आले. तसेच बाहेरून घरात कोणी आल्याच्या पायाचे ठसे आढळले नाहीत. केवळ घरातील हॉल ते खोलीपर्यंतच एकाच्या तळपायाचे ठसे पाहणीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गृह कलहातून हा प्रकार तर झालेला नाही ना? कुटुंबातील कोणाचा यात सहभाग आहे का, यादृष्टीनेही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.