सततच्या पावसाने मुगासह उडीदास फुटले कोंब

1 min read

सततच्या पावसाने मुगासह उडीदास फुटले कोंब

शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार?-सोमनाथ नागुरे

सिद्धेश्वर गिरी/सोनपेठ: मागील एक महिन्यापासून सुरु असणाऱ्या सततच्या पावसाने शेतातील हाती येणाऱ्या मुगासह,उडीद पिकास झळ पोहचली असून काढणी अगोदर पिकांना कोंब फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस चांगला असेल या भावनेने शेतकऱ्यांनी सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली खरी!
WhatsApp-Image-2020-08-20-at-3.47.04-PM--1-
मात्र बियाणे खराब निघाल्याने तब्बल दोन-तीन वेळा पेरणी करून फरक नसल्याने शेतकऱ्यांनी मुग,उडीद यासह बाजरी,कापूस या पिकांची लागवड करत पेरणी केली. मात्र यावर्षी मागील एक महिन्यापासून असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारा माल कोंब फुटल्याने वाया जात असून पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील पाच वर्षापासून निसर्गाची अवकृपा नेहमी दोन-तीन वेळा होणाऱ्या पेरण्याची झळ यामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत असतांनाच पुन्हा पुन्हा येणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभारले आहे.

शेतकरी संघटनेचे युवक नेते सोमनाथ नागुरे 

शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार?-सोमनाथ नागुरे
शेतीप्रधान देशाची आर्थिक उन्नती करणारा आपला देश आहे. मात्र देशात शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार? असा सवाल शेतकरी संघटनेचे युवक नेते सोमनाथ नागुरे यांनी उपस्थित करत. आपत्तीग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. खत,बियाणे,मजुरी या सर्व मशागतीला जो आर्थिक खर्च लागला. तो देखील मिळणे मुश्किल झाले आहे. गळ्यापर्यंत आलेला घास तोंडापर्यंत जाईल याची देखील खात्री कोणी देऊ शकत नसणारे आणि त्याच शेतकऱ्यांप्रती असणारी शासनाची असंवेदना यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील. अशी भीती व्यक्त करत तात्काळ पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी नागुरे यांनी केली आहे.