दुर्देव: रस्त्याअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू.

1 min read

दुर्देव: रस्त्याअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू.

रस्त्या अभावी रुग्णालयात वेळेवर पोहचू न शकल्याने प्रसुती दरम्यान मृत्यू. रस्त्यासाठी गोदाकाठच्या अकरा गावांनी विधानसभा निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार.

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ: गोदाकाठच्या गावातील महिला रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात पोहचू न शकल्याने  प्रसुती दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोनपेठ तालुक्यात घडली.‌‌सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याची मोठी गंभीर दुरावस्था झाली आहे.या रस्त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.या रस्त्यासाठी गोदाकाठच्या अकरा गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.‌‌दि.१८ रोजी सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या वाडीपिंपळगाव येथील महिलेचा प्रसुतीसाठी वेळेवर न पोहचल्यामुळे प्रसुतीदरम्यान मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रुक्मिण जाधव वय (२८) या महिलेस सकाळी प्रसुती वेदना सुरु झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात जाण्यासाठी काही वाहनाची व्यवस्था होईल का यासाठी अनेकांना विचारलं  पण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन धारकांनी वाडी पिंपळगाव येथे येण्यास नापसंती दर्शवली तब्बल तासा भरानंतर शेजारील गावातील एक वाहन चालक आल्याने महिलेस परळी येथे नेण्यात आले.परंतु वाडी पिंपळगाव ते उक्कडगाव या दरम्यान रस्ता प्रचंड खराब असल्याने व पाऊस पडत असल्याने दोन किलोमीटर साठी अर्धा तास लागला.सदरील महिलेस परळी येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण वेळेवर न पोहचल्यामुळे महिलेच्या प्रसुतीत रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला आणि प्रसूती ही गंभीर झाली सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला पण तिची प्रकृती बिघडल्याने तिला अधिकच्या उपचारासाठी आंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले पण अंबाजोगाई येथे पोहचेपर्यंत तिचा मृत्यू  झाला होता.सोनपेठ तालुक्यातील

गोदाकाठच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असुन गंभीर रुग्णांना गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी नेहमीच त्रास होतो. (माधव जाधव मृत महिलेचे नातेवाईक )