एक वर्तुळ पूर्ण

सिंधिया म्हणजेच शिंदे घराण्याच्या राजकारणातील तिसरी पिढी कॉंग्रेस सोडून भाजपत प्रवेश करते आहे. या निमित्ताने राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण होत आहे.

एक वर्तुळ पूर्ण

आज्जी दीर्घकाळ खासदार, एक आत्या एका राज्याची दीर्घकाळ मुख्यमंत्री, एक आत्या स्वतःच्या राज्यात आमदार आणि मंत्री, एक आत्या नेपाळच्या राजाची पत्नी, आणि वडील केंद्रात मंत्री. अशी मोठी राजकीय परंपरा आणि वारसा लाभलेले ज्योतिरादित्य आता प्रसिद्धीच्या वलयात आलेत आणि एक वर्तुळ पूर्ण करताना दिसत आहेत.

'राजमाता' अशी आदर आणि प्रेमाने उपाधी मिळालेल्या विजयाराजे सिंधिया या राष्ट्रीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्ये होत्या. . ग्वाल्हेरवर राज्य करणाऱ्या राजमातानी 1957 मध्ये काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. केवळ 10 वर्षांत त्यांचा अपेक्षाभंग झाला आणि 1967 मध्ये त्यांनी संघाची वाट धरली. त्यांच्या नेतृत्वातच ग्वाल्हेर क्षेत्रात जनसंघाची ताकद वाढली. एवढी की 1971 मध्ये इंदिरा गांधीच्या लाटेतही या भागातून भाजपाचे तीन खासदार निवडून लोकसभेवर गेले होते. या लाटेने भारताला भावी, कणखर असा पंतप्रधान दिला. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. राजमाता स्वतः भिंडमधून, अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेर आणि राजमाता यांचे पूत्र आणि ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव गुनामधून खासदार झाले.
माधवराव जनसंघाकडून पहिल्यांदा खासदार झाले खरे पण ते तेथे रमले नाहीत. ते काँग्रेसमध्ये गेले. अगदी आईच्या विरोधात गेले. कुटुंब तुटले. महाराष्ट्र राज्यात जसे प्रयोग कुटुंब तोडण्याचे आता होत आहेत तसे काँग्रेसने पाच दशक आधी मध्यप्रदेशात केले आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे मराठी कुटुंबासोबत हे प्रयोग झाले.
सिंधिया कुटुंब विभक्त झाले. मुलगा आई विरोधात गेला. माधवराव खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले. काँग्रेस मध्ये त्यांची उपेक्षा देखील झाली त्यांनी बंड केले पण परत काँग्रेसमध्येच गेले. माधवराव यांचा राग केंद्रीय नेतृत्वावर होता. शेवटी त्यांचे अपघाती निधन झाले. यावर देखील अनेक चर्चा आणि वाद आहेत. हा अपघात नव्हे तर घातपात होता असे बोलले जाते. अशा चर्चा प्रत्येक राजकीय नेत्यांच्या मृत्यूनंतर होत असतातच. अगदी लाल बहादूर शास्त्री, राजेश पायलट किंवा संजय गांधी यांच्या मृत्यूबद्दल देखील संशय आहेतच.
तो विषय इथे लिहायचा नाही. आपण सिंधिया घराण्यातील वर्तुळ पूर्ण होण्याबद्दल बोलतोय.
राजमाता विजयाराजे यांना नेहमी असे वाटे की आपले कुटुंब राजकीय दृष्टया विभक्त असू नये. ते भारतीय जनता पक्षात असावे. म्हणूनच त्यांच्या सगळ्या मुली या भाजपामध्ये राहिल्या आणि सन्मानजनक स्थान देखील मिळाले.
पण आई आणि मुलगा मात्र दोघांच्या हयातीत एकाच पक्षात येऊ शकले नाहीत. हे वास्तव आहे.

पित्याची जशी काँग्रेस पक्षात उपेक्षा झाली तशी आता पुत्र ज्योतिरादित्य यांची देखील उपेक्षा पक्षात होऊ लागली होती. पित्याच्या निधनानंतर कधीच पराभूत न झालेले ज्योतिरादित्य २०१९ च्या निवडणूकित मात्र पराभूत झाले आणि त्यांना पक्षातून बेदखल करण्यात येऊ लागले. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यावर तरुणांना संधी मिळेल त्यात नव्या दमाचे ज्योतिरादित्य देखील असतील अशी अपेक्षा होती. मात्र मध्यप्रदेश मध्ये बहुमत मिळतातच ज्योतिरादित्य यांच्या ऐवजी कमलनाथ यांच्या गळ्यात सत्तेची माळ पडली. प्रदेशअध्यक्ष म्हणून देखील कमलनाथ राहिले. शेवटी राज्यसभेवर संधी मिळेल अशी आशा असताना वयोवृद्ध कमलनाथच ते ठरवतील असे पक्षाच्या हायकमांडनी ठरवले. माधवराव यांच्या मुलावर सोनिया गांधी 'कोणता राग' काढत होत्या कोणास ठाऊक? राहुल गांधी देखील आपल्या आईचा कित्ता गिरवत ज्योतिरादित्य यांना दूर ठेवत होते.
सत्ता आणि पदे यांची खैरात असलेल्या घरात ज्योतिरादित्य राजकीय विजनवासात जाणे शक्यच नव्हते. म्हणूनच ते अवस्थ होते. आणि ही अवस्थता या निमित्ताने समोर आली.
ही अवस्थ अवस्थाच एक राजकीय वलय पूर्ण करायला कारणीभूत ठरते आहे.
आज्जीला जे हवे होते ते आता घडते आहे सिंधिया परिवार आता एकाच पक्षात येतो आहे. पण ना राजमाता ना माधवराव कोणीच हे बघायला हयात नाहीत.

गुजरात कनेक्शन

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्नी प्रियदर्शनी या गुजरात मधील बडोदा संस्थानच्या राजकुमारी आहेत. त्यांचे पिता कुमार संग्राम सिंह गायकवाड़ बडोदाचे शेवटचे शासक प्रताप सिंह गायकवाड़ यांचे पुत्र आहेत. प्रियदर्शिनी यांची आई नेपाळ येथील राजघराण्याशी नात्यात आहेत. ज्योतिरादित्य यांच्या आत्या देखील नेपाळच्या राजघराण्यातील सदस्य आहेत.पत्नी प्रियदर्शीनी या गुजरातच्या असणे हे देखील ज्योतिरादित्य यांच्या भाजपसोबतच्या जवळीकतेचे कारण असावे.

तरूणांना सांभाळ
कॉंग्रेसने तरूण नेतृत्व सांभाळण्याची वेळ आली आहे. दिग्विजय, कमलनाथ,गेहलोत या वय झालेल्या नेत्यांना अजूनही पुढे करण्यापेक्षा नव्या पिढीच्या हाती पक्ष देणे आवश्यक आहे. वयाच्या साठीत बोहल्यावर चढणारे नेते, उताारवयात देखील अनेक लग्न करून पुन्हा अजून यौवनात मी चा फिल देणारे नेते पक्ष सांभाळणार असतील तर तरूण नेते वेगळी वाट धरणारच


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.