नवी दिल्ली: निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवासा पुढच्या महिन्यात फिलिपिन्सस्थित एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) येथे उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.1980 च्या तुकडीतील निवृत्त आयएएस अधिकारी लवासा हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्यासाठी दावेदार होते आणि निवडणूक आयोगात त्यांचा कार्यकाळ बाकी होता.
23 जानेवारी 2018 रोजी त्यांनी भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता आणि ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहणार होते. मात्र, आता ते आता एडीबीचे उपाध्यक्षपद भूषवतील. ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त दिवाकर गुप्ता यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, “एडीबीने अशोक लवासा यांना खासगी क्षेत्राचे संचालन व सार्वजनिक खासगी भागीदारीकरिता बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत आहे.
निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी लवासा केंद्रीय वित्त सचिव म्हणून निवृत्त झाले. याआधी ते पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव होते.
विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल क्लीन चीट मिळाल्याबद्दल विरोध केल्यामुळे लवासा चर्चेत आले. निवडणुकीच्या काही काळानंतर लवासा, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध आयकराची नोटीस पाठविली गेली होती.