नेतृत्व फडणवीस यांचेच

महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या वतीन फक्त देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व राहील हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा अधोरेखीत केलं आहे.

नेतृत्व फडणवीस यांचेच

महाराष्ट्रः केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या प्रकाश जावडेकरांना मंत्रीमंडळातुन वगळण्यात आलं आहे. प्रकाश जावडेकरांना वगळल्यांनंतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना आनंद झाल्याचं सुरुवातीला दिसत आहे. जावडेकर हे गेल्या अनेक काळापासुन दिल्लीमध्ये राष्ट्रीय प्रवक्ता म्हणुन काम करत होते, राज्यसभेवर गेले, मंत्रीमंडळात गेले. मागच्या आणि या मंत्रीमंडळातही प्रकाश जावडेकरांना चांगल स्थान देण्यात आलं होतं. त्यांच्या बद्दल अशी चर्चा होती की, ते महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांशी नीट बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातुन वगळणं ही भाजपच्या नेत्यांसाठी आनंदाची गोष्ट होती. रावसाहेब दानवेंच मंत्रीपद जाता जाता राहिलं आणि ते त्यांना फायदेशीर ठरलं कारण अन्न नागरी पुरवठ्यासारख्या मंत्रालयातुन थेट रेल्वे राज्य मंत्री म्हणुन त्यांची नियुक्ती झाली आहे. आता रेल्वे राज्य मंत्री झालेले दानवे औरंगाबाद जालना मार्गासाठी काही वेगळा मार्ग निवडतात का? हे पहाणं गरजेचं आहे.

भारती पवार, नारायण राणे यांची निवड ही महाराष्ट्रातल्या राजकारणात बदल घडवणारी आहे आणि बळ देणारी आहे. नारायण राणे एक आक्रमक नेते आहेत, त्यांचा समावेश झालेला आहे. भारती पवार यांच्या भागातही भाजपचा प्रभाव वाढू शकतो या उद्देशाने त्यांना मंत्रीपद देण्यात आलं असावं. या सगळ्यात भागवत कराड यांची नियुक्ती आश्चर्यकारक आहे. त्यांना थेट अर्थ राज्यमंत्री हे अत्यंत महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे. भागवत कराडांएवजी हे मंत्रीपद प्रितम मुंडेंना दिलं जाईल असं वाटलं होतं कारण त्या दूस-यांदा राज्यसभा खासदार झाल्या आहेत, तसंच मोठ्या मताधिक्याने बीडमधुन निवडुन आल्या आहेत. परंतु वंजारा समाजाची निवड करताना भागवत कराडांची निवड करण्यात आली यामागे मोठं राजकारण आहे.

मुंडे गटाची नाराजी होईल हे सुर्यप्रकाशाईतकं स्पष्ट आहे. या नाराजीला विरोध करणारा एक वर्ग भाजपमध्ये आहे. फडणवीस समर्थकांचा वर्ग याला विरोध करतो आहे. म्हणजेच मुंडे भगिनी नाराज आहेत असं म्हंटल्यावर विरोधकांपेक्षा भाजपमधलाच एक गट त्याचा विरोध करतो आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणात ज्यांना फटका बसला, ते सगळे या प्रकारात घराणशाही नाकारल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. खरोखर घराणेशाही नाकारण्यात आली आहे, की आणखी काही? याचा विचार करणंही गरजेचं आहे.

या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फक्त देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व राहील हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा अधोरेखीत केलं आहे. फडणवीसांनी ज्यांची नावं सुचवली किंवा त्यांच्या सोबत ज्यांची तडजोड झाली तेच नेते सध्या केंद्रीय नेतृत्वामध्ये आहेत हे समोर येतं. फडणवीस आणि दानवेंच फारसं जमत नव्हतं परंतु रावसाहेब दानवेंनी तडजोड केल्यामुळेच त्यांच केंद्रातील मंत्रीपद टिकलं असावं. भागवत कराड यांना केंद्रातील राज्य मंत्रीपद मिळणं हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच घडलं, हे स्पष्ट आहे. त्यांची ईच्छा होती म्हणुनच पहिल्यांदा राज्यसभेत गेलेले भागवत कराड थेट केंद्रात पोहोचले आहेत. नारायण राणे, भारती पवारांनाही फडणवीसांच्या ईच्छेमुळेच मंत्रीपद मिळालं आणि प्रकाश जावडेकरांची गच्छंतीही महाराष्ट्रात फडणवीसांना अडचण नको, म्हणुनच करण्यात आली आहे.

दीर्घकाळापासून देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणुन जातील अशी चर्चा चालू होती. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल अशी शक्यता दिसत नाही आणि त्यामुळेच फडणवीसांना केंद्रात मंत्री म्हणुन घेतलं जाईल, असा तर्क लावला जात होता. दूसरा तर्क असा लावला जात होता की, देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये मंत्रीपद देऊन शिवसेनेसोबत राज्यामध्ये तडजोड केली जाईल. परंतु अशा पद्धतीची तडजोड करणं हे नरेंद्र मोदींच्या स्वभावात बसत नाही. म्हणजे ज्यांनी आपल्याला नाकारलं आहे किंवा ज्यांना आपण नाकारलं आहे त्यांच्याशी पुन्हा तडजोड करणं हे मोदींच्या स्वभावात बसत नाही. त्यामुळे शिवसेनेशी तडजोड केली जाईल, असं वातावरण निर्माण केलं जात होतं, ते खोटं होतं हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं कारण फडणवीस राज्यामध्येच राहणार आहेत.

केंद्रात किंवा राज्यात, नेत्यांनी कुठे जायचं हे स्पष्ट केलं पाहिजे आणि स्पष्ट केल्यावर त्यांना ती जबाबदारी दिली जाते असं मोदींच धोरण आहे. पूर्वी रावसाहेब दानवेंना मंत्रीपदावरुन दूर केल्यानंतर राज्यामध्ये अध्यक्ष करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन पुन्हा केंद्रात बोलावण्यात आलं होतं. गोपीनाथ मुंडेंच्या बाबतीतही तेच झालं आहे. आपण कुठे काम कारायचं हे नेत्यांनी ठरवायचं आणि त्यानुसार मोदींकडून जबाबदारी दिली जाते. पंकजा मुंडे यांना राज्यात काम करण्याची ईच्छा नव्हती म्हणुन त्यांना केंद्रीय सचिवपद देण्यात आलं आहे. आता त्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी मध्ये आहेत. पक्षाचं देशस्तरावरचं आणि राज्यस्तरावरचं सरकार यात मोठा फरक आहे. मात्र यात फक्त चंद्रकांत पाटील हे एक अपवाद आहेत.

देवेंद्र फडणवीसांनाही त्याच पद्धतीचा पर्याय देण्यात आला होता. परंतु त्यांनी राज्यात राहणं पसंत केलं किंवा फडणवीसांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी मोदींची ईच्छा होती. त्यामुळे फडणवीसांनी राज्यासाठी जे जे करण्याचा निश्चय केला ते करु देण्याचा मोदींचा राज्यासाठी प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे राज्याचं नेतृत्व फडणवीसच करतील, तेच भाजपचे नेते असतील, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा होईल, तेव्हा फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणुन पुढे येतील. त्यामुळे यातुन एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे महाराष्ट्रात फडणवीसांना भाजपमधून दूसरा स्पर्धक नाही. माध्यमं जरी पंकजा मुंडेंचा वारंवार स्पर्धक म्हणुन उच्चार करत असली तरीही, त्यांना केंद्रीय स्तरावर पक्षात काम कारवं लागेल हे स्पष्ट झालं आहे. कदाचीत पुढच्या काळात पंकजा मुंडेंना पक्षात दुसरं महत्त्वाची जबाबदारी मिळु शकते परंतु तोपर्यंत त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना धीर धरता येईल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

खरंतर सध्याच्या घडीला भागवत कराडांना मंत्री करणं हे पंकजा मुंडेंवरती शिरकाण आहे असंच मानलं जात आहे. ओबीसीच नेतृत्व म्हणुन कराडांना पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे, असाही संदेश दिला जात आहे. परंतु भागवत कराड ओबीसीचे सर्वमान्य नेते होऊ शकतील का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. भागवत कराडांना मंत्रीपद देऊन औरंगाबादमध्ये भाजपला संधी मिळु शकते अशीही शक्यता दिसते आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच नेतृत्व भाजपकडून समोर आलं आहे, ते असणार आहे यासंबंधीच्या स्पष्ट सूचना भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आलेल्या आहेत.  दोन वर्ष उलटली तरीही महाविकास आघाडीचं सरकार पडलेलं नाही, ते पडण्याची शक्यताही नाही. त्यामुळे फडणवीस कोणता नवा डाव टाकतात हे पहाणंही आवश्यक आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमीरा अनेकांना अस्वस्थ करतो आहे. ईडीमुळे हे सरकार पडेल की आणखी कोणता डाव टाकला जाईल. १२ आमदार निलंबीत करुन आधीच भाजपच संख्याबळ कमी करण्यात आलं आहे, हा डाव टिकेल का? याचाही विचार करावा लागणार आहे. परंतु या विस्तारात देवेंद्र फडणवीस 'सब कुछ' आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.