विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या

1 min read

विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या

जिंतूर तालुक्यातील पाचेगांव शिवारातील घटना

जिंतूर/सिद्धेश्वर गिरी:  जिंतूर तालुक्यातील पाचेगांव येथील 60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने अतिवृष्टी मुळे हातातोंडाशी आलेल्या  पिकाचे नुकसान झाल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या आर्थिक विवंचनेतून  स्वतःच्या शेतीमधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  मंगळवार 3 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिंतूर पोलीसात गुरुवार 5 नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाचेगांव शिवारात अतिवृष्टी झाल्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पुर्णतः नष्ट झाल्याने परिसरातील 60 वर्षीय रामभाऊ बहिरट या वृद्ध शेतकऱ्याने सोमवार 2 नोव्हेंबर रोजी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या आर्थिक विवंचनेत सापडून स्वतःच्या शेतीमधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याबाबत कुटुंबियांनी सदरील शेतकऱ्याचा परिसरात एक दिवस शोध घेतला मात्र 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मयत वृद्ध शेतकऱ्याच्या भावाला विहिरीत मृतदेह असल्याचे आढळून आल्यानंतर गावातील छत्रभुज ससे आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा धम्मपाल बहिरट यांच्या  फिर्यादीवरून पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, 2  मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.