शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ.

1 min read

शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ.

प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख अजून कळल्याचे दिसत नाही. पंचनामे करत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा:-सुधीर बिंदू

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ: मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पीकही शेतक-यांच्या हातून गेलं. शेतकऱ्यांची मदार उरल्या-सुरल्या कापसावर होती मात्र शनिवार, रविवार रोजी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे आणली आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहेत. पेरणी हंगामात दुबार,तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर मूग काढणीवेळी आलेल्या पावसाने पुन्हा संकट उभे केले होते. त्यावर मात करत शेतकऱ्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला असतानाच सोयाबीन काढणी हंगामात सलग दहा दिवस सुरू असणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुन्हा परतीच्या पावसाने कापसावर मदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणली आहेत. होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांत त्रेधातिरपीट निर्माण झाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. मुगकाढणी वेळीही पावसाने असाच हाहाकार माजवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मुग काळे पडल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले होते. यामुळे या मुगास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. ते संकट कायम असतानाच सोयाबीन पिकावरील संकट आणि आता कापूस वेचणीत आलेल्या जोरदार पावसाने आर्थिक संकट निर्माण केले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा:-सुधीर बिंदू
प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख अजून कळल्याचे दिसत नाही. मोठ्या हिमतीने पिकवलेले पीक हातून जात आहे. हे पहाताना काय यातना सहन कराव्या लागतात ते शेतकरीच जाणतो मागील पावसातही एका दिवसात पंचनामे करण्याचे दिलेले आदेश म्हणजे आदेश देऊन शेतकऱ्यांना आशेला लावत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करत या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना धीर द्यावा अन्यथा येणाऱ्या संकटावर मात करताना शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्यासारखा निर्णय घेतील अशी भीती शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी पीक पंचनाम्याचे आदेश काढणे म्हणजे शेतकऱ्यांना तो आदेश काढून आशेला लावल्यासारखे दिसते. आज तात्काळ पंचनामे करुन सरसगट मदत मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करावी. त्याचबरोबर अशा येणाऱ्या संकटावर मात करताना शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे भविष्यात आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या मन परिवर्तनासाठीही शासनाने पावले उचलली पाहिजेत असे मतही बिंदू यांनी व्यक्त केले.