पावसाने शेतकरी हवालदिल,प्रशासनाने एक दिवसाच्या पंचनाम्यातून काय साधले?

1 min read

पावसाने शेतकरी हवालदिल,प्रशासनाने एक दिवसाच्या पंचनाम्यातून काय साधले?

उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर रस्तेही बंद.

सिध्देश्वर गिरी/परभणी: मागील दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदील झाला आहे, होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. मूग कापणी वेळीही पावसाने असाच हाहाकार माजवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मूग काळे पडल्याचे प्रकार घडले होते.
यामुळे या मूगास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. ते संकट कायम असतानाच आता सोयाबीन हाती आले असता, शेती कामाची लगबग शेतकऱ्यांमध्ये दिसून येत होती. मात्र मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरही आर्थिक संकट ओढावले आहे.
जिल्ह्यातील राजकीय पक्षांमध्ये या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २१ सप्टेंबर रोजी शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून २२ सप्टेंबर रोजी सदर नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. एकंदरच एक दिवसाच्या पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवून सार्थकी काय लावले? असा सवालही वेगवेगळ्या संघटनांच्या शेतकरी प्रतिनिधीकडून उपस्थित होत आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीवरून अद्यापही नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याची चर्चा आहे. यामुळे या पंचनाम्यात गडबड कुठे?असा सवालही आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. शेतीपिकांच्या नुकसानीमुळे हैराण असणाऱ्या त्रस्त शेतकऱ्यांना रस्त्याचाही सामना करावा लागत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय बनून रस्त्यावर पाणी साचल्याने मार्ग बंद झाल्याचे चित्र दिसत आहे.
WhatsApp-Image-2020-09-26-at-11.17.33-AM
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा-सोमनाथ नागुरे
प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख अजून कळल्याचे दिसत नाही, मोठ्या हिमतीने पिकवलेले पीक हातून जात आहे. हे पाहताना काय यातना सहन कराव्या लागतात, ते शेतकरीच जाणतो एका दिवसाच्या पीक पंचनाम्याचे आदेश काढणे म्हणजे शेतकऱ्यांना तो आदेश काढून आशेला लावल्यासारखे दिसते. आज तात्काळ पंचनामे करुन सरसगट मदत मिळणे गरजेचे आहे आणि शासनाने तो निर्णय घेऊन तत्काळ पाऊले उचलावीत. शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करावी. त्याचबरोबर अशा येणाऱ्या संकटावर मात करताना शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे भविष्यात आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या मन परिवर्तनासाठीही शासनाने पावले उचलली पाहिजेत, असे मत शेतकरी संघटनेचे नेते सोमनाथ नागुरे यांनी व्यक्त केले.