वाळूमाफियांचा फिल्मीस्टाईल थरार, पोलीस येताच आरोपी पसार

वाळूमाफियांचे दहा ते पंधरा जण घटनास्थळी, अरेरावी करून धमकावून कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न...

वाळूमाफियांचा फिल्मीस्टाईल थरार, पोलीस येताच आरोपी पसार

औरंगाबाद: वाळू माफियांच्या मागावर असलेल्या तहसीलच्या पथकाला वाळू माफियांनी काल गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. दुपारी सुरु झालेला हा थरार रात्री ११ वाजेला संपला. अखेर पोलीसांच्या मदतीने हायवा जप्त करण्यात तहसीलच्या पथकाला यश आले. आरोपी मात्र पसार झाले आहेत. फिल्मीस्टाईल झालेल्या या थरारामध्ये महसूलपथक आणि पोलीसांची चांगलीच तारांबळ झाली.

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत देवडे, तलाठी संजय पवार, दिलीप बिरारे, रोहिदास चव्हाण, दिलीप जाधव, एल.के.गाडेकर आणि सुरक्षारक्षकांसह दोन जीप घेऊन पथक काल (दि.९) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास गस्तीवर होते. सोलापूर-धुळे महामार्गावरून पथकाची गस्त सुरू असताना वाळूची बेकायदा वाहतूक करणारा हायवा (क्र.एम.एच.२०.ई.एल.९०३६) भरधाव शहराकडे येत होता. तहसीलच्या पथकाने वाळूच्या हायवाचा पाठलाग सुरू केला. महानुभाव चौकात जीप आडवी लावून हायवा थांबविण्यात पथकाला यश आले.

त्यानंतर हायवा जप्त करण्यात आला. तहसीलकडे हायवा नेण्यासाठी पथकातील एका कर्मचाऱ्याला हायवासोबत बसविण्यात आले. हायवापुढे एक जीप, मध्ये हायवा आणि पाठीमागे एक जीप असा हा ताफा तहसीलच्या दिशेने निघाला. रेल्वे स्टेशनला वळसा घालून बाबा पेट्रोलपंप चौकाकडे निघाल्यानंतर उड्डाणपुलाच्या जवळच रस्त्याच्या कडेला प्रचंड दलदल दिसताच हायवाचालकाने काही कळण्याच्या आत दलदलीमध्ये हायवा फसवला. संधी पाहून चालकाने फोन केल्यामुळे वाळूमाफियांचे दहा ते पंधरा जण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तहसीलच्या पथकाला अरेरावी करून धमकावून कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न केला. तोपर्यंत महसूल पथकाने पोलीसांना घटनास्थळी बोलावलेे. परंतु बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे पोलीस पोहोचण्यास उशीर झाला. फसलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबी बोलाविण्यात आले.

ही कारवाई सुरू असताना रात्री आठच्या सुमारास छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे व त्यांचे सहकारी तसेच वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची मोठी कुमक दाखल होताच वाळूमाफियांनी तेथून पळ काढला. चालकासह त्याला सोडविण्यासाठी आलेले सर्व जण पसार झाले. त्यानंतर रात्री साडेअकरापर्यंत ट्रक बाहेर काढण्याची कारवाई सुरु होती. ट्रक बाहेर काढून तो जप्त करण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.