मुंंबईः तुकाराम मुंढे यांची राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिध असणारे तुकाराम मुंढे यांची पाच महिन्यापूर्वी नागपूरच्या महापालिका आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर कोणत्याही पद्भाराविना असलेल्या त्यांना अखेर नियुक्ती देण्यात आली आहे.
नागपूरमध्ये आयुक्त म्हणून काम करताना मुंढे यांनी कोणाचीही पर्वा न करता धडाक्याने निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. नागपूर शहराला आणि महापालिकेच्या प्रशासनाला तुकाराम मुंढे यांनी कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागपूर महापालिकेचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासन असा वाद निर्माण झाला होता.
या वादामुळे अखेर तुकाराम मुंढे यांची बदली मुंबईत राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली होती. पण त्या ठिकाणची नियुक्ती प्रलंबित होती. पण मुंढे यांनी त्या पदाचा चार्ज घेण्यापूर्वीच त्या ठिकाणी दुसऱ्याच एका अधिकाऱ्याची परस्पर नियुक्ती राज्य शासनाने केली होती. त्यामुळे गेली पाच वर्षे तुकाराम मुंढे हे कोणत्याही पदभाराविना होते. पण आज त्यांची नियुक्ती राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदी करण्यात आली.