परभणी : मालमत्ता कर न भरणार्या नागरिकांविरूध्द मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त देविदासराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला आहे.
मनपा हद्दीतील थकित मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या शास्तीत ३१ मार्चपर्यंत १०० टक्के सूट देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी मालमत्ता करापोटी असलेली थकबाकी तातडीने भरावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महापालिका क्षेत्रातील थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये गेला आहे. पाणीपट्टीची फक्त ३ लाख रुपयांची वसुलीच आतापर्यंत झाली आहे. चालू थकबाकी ४ कोटी २३ लाख रुपये आहे. एकूण १५ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी असल्याचेही ते म्हणाले. मालमत्ता कराची चालू थकबाकी २३ कोटी ५९ लाख रुपये आहे. त्या दुप्पट म्हणजे ५६ कोटी ८६ लाख एकूण थकबाकी आहे. विशेष म्हणजे २७ कोटी रुपयांची शास्ती असल्याचेही ते म्हणाले. शहरात ७३ हजार ६७७ एकूण मालमत्ताधारक आहेत. ६५ हजार १७१ रहिवाशी असून ८ हजार ५०६ अनिवासी मालमत्ता आहेत. १७२ शाळा, ३२ मंगल कार्यालये व ८० हॉटेल असल्याचे ते म्हणाले.
मालमत्ता करापोटीची थकबाकी मोठी असून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले एक हजार ८२ जण असून त्यांच्याकडे १५ ते १६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ७ हजार ८६ अनिवासी मालमत्ताधारकांकडे १४ कोटीची तर व्यावसायिक मालमत्ता सहा हजार ८४३ असून त्यांच्याकडे ३० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचेही यावेळी पवार म्हणाले. या तुलनेत वसुली कमी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी थकबाकी तातडीने भरावी, शास्ती माफ केलेली असल्याने त्याचा लाभ घ्यावा, अन्यथा महापालिकेस वसुलीकरीता कठोर पावले उचलावी लागतील. वेळप्रसंगी मालमत्ता जप्तीची कारवाई करावी, लागेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, ३३ लाख रुपयांची ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा केला असल्याचे पवार यांनी नमूद केले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त देविदास जाधव, अल्केश देशमुख, गजानन जाधव, राजकुमार जाधव आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.