माफ कर ग आम्हाला

कधी जळगावच्या वसतीगृहात तर अधिक उस्मानाबादच्या स्वतःच्या घरात पोलीसांकडून तू लुटली जातेस. कधी कोविड सेंटरवर डॉक्टरकडून तू लुटली जातेस जणू कांही तू लुटिचा माल..

माफ कर ग आम्हाला

माफ कर ग आम्हाला!
तू लूटली जातेस, तू ओराबडली जातेस, तू तुझं सर्वस्व गमावतेस, आणि आम्ही मात्र तुझ्या लुटल्या जाण्याची चर्चा करत आंदोलने पेटवत असतो. कधी जळगावच्या वसतीगृहात ज्यानी तुझे रक्षण करायला हवे तेच तुला नागवतात आणि त्याचे चित्रिकरण करतात. किती विकृत झालो आहोत आम्ही. तुझ्या नग्नदेहाचे दृश्य मिटक्या मारत बघणारे आम्हीच पिशाच्च आहोत. आम्ही हे थांबवत नाही कधी आणि ना थांबवू शकतो. यात तुझे नागवले जाणे आम्ही थांबवू शकत नाही. मात्र मेणबत्ती पेटवून तुला श्रध्दांजली वाहतो. आणि हो फेसबुक आणि व्हाटसअप वर निषेध देखील नोंदवतो. या पेक्षा आणखी काय करू शकतो आम्ही? पुरूषी अहंकाराने भरलेले आम्ही, तुझ्या लुटल्या जाण्याचा विषय देखील जोरदार उचलतो.
माफ कर ग आम्हाला!
तू दिल्लीच्या गजबजलेल्या वाटेवर लुटल्या गेलीस, महालक्ष्मीच्या स्टेशनजवळ ओरबाडल्या गेलीस, तर बीड नगर रोडवर कधी श्वापदांची शिकार बनलीस. कोठेवाडीच्या गावात तूझ शील लुटीचामाल ठरलं आणि जंगम मालमत्तेसोबत तुझ सगळ मंगल देखील ते लुटून नेले. कधी मुंबापूरीच्या समुद्र किना-यावर रक्षकच तुझ्यासाठी भक्षक बनला. आणि आम्ही फक्त चर्चा करत राहिलो तुला न्याय देण राहूनच गेलं. अलिकडे औरंगाबदच्या कोविड सेंटरवर आजारी असलेल्या तुझ्या देहाचा मोह देखील तुझ्यावर उपचार करणा-या डॉक्टरला पडतो. आणि तुला उपभोगण्याची अपेक्षा तो ठेवतो. तर कधी पनवेलच्या कोविड सेंटरवर तुला ओराबडले जाते. तू आजारी असल्याची जाणिव देखील त्या नराधमांनी राहत नाही. कधी उस्मानाबादचा पोलीस तुझ्या अब्रुला लुटतो. आणि बंदुकीच्या धाकावर तुला लुटत राहत राहतो. तू जीव देतेस आणि आम्ही त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू असा शब्द देत राहतो.
माफ कर ग आम्हाला!
हे आज घडलय असं नाही, अनेक वर्षापासून हे घडत आलं आहे. पुराणात तुला पळविणारा रावण वाचला होता आम्ही. महाभारतात तुझ्या साडीला हात घालणारा दु:शासन ऐकला होता. त्यावेळी पुराणातील वांगी पुराणात राहतील वाटल असं वाटलं होत. ती वांगी आता वर्तमानकाळात देखील आली आहेत. तुझ्या देवी रूपाची पुजा मांडण्याची भाषा करणारे आम्ही तुझी ‘पुजा’ कधी करतो ते कोणालाच समजत नाही. तू आत्महत्या करतेस. आणि आम्ही करू शकतो तो फक्त निषेध. तू कधी कोणाविरूध्द आवाज उठवलास ना तर आम्ही तुलाच बदफैली ठरवतो. आणि ती तशीच आहे असा सूर आळवत तुझ्या लुटल्या गेलेल्या इज्जतीचा बाजार मांडत बसतो.
उल्हासनगरच्या परीक्षा हॉलमध्ये रिंकू पाटील म्हणून तुला जाळतात. तर कधी अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयासमोर पूनम गंभिरे म्हणून मारतात. तर कधी भर चौकात अमृताला देशपांडेला यमसदनी धाडतात. आम्ही मात्र गप्प उभे असतो. “बाप रे काय होतय हे सगळं!” अस म्हणत भयचकीत होऊन. आम्ही नाही थांबवू शकत मारणारांचे हात. कारण आमचेही हात अशाच कुठल्यातरी प्रकरणात अडकलेले असतात.
माफ कर ग आम्हाला!
आम्ही बनलोय थंड, थंड कसले षंढच. आपल्या मनातील राक्षसाला लपवत सज्जनपणाचा बुरखा पांघरून पांढपेशी झालेले आम्ही. आता सवयच लागून गेलीय या सगळ्याची पूर्वी मनातल्या मनात निषेध करायचो आता आम्ही. आता टीव टीव करतो किंवा फेसबुक टिचक्या मारत निषेध व्यक्त करतो. आणि जमलच तर जात शोधायचा प्रयत्न करतो. या पेक्षा आणखी काय करू शकतो. खुप कांही करता येऊ शकलं असतं अशा नराधमाना थांबवता येऊ शकलं असत. ओळखता येऊ शकलं असतं, आणि तुला सावधही करता येऊ शकलं असतं पण नाही केलं आम्ही. आम्ही काय केले असेल तर जमेल त्यावेळी अशा प्रकरणाची व्हिडीओ करून सोशल मिडियावर अपलोड केली आहेत. त्यावेळी तुझ्या इज्जतीचे धिंडवडे पुन्हा पुन्हा निघणार आहेत याची जाणिव देखील आम्हाला राहत नाही.
माफ कर ग आम्हाला!
कधी कधी आम्ही आमचं थंडपण झाकण्यासाठी तुलाही दोष देतो बरका. सहन कर हे सगळं. कधी तुझ्या कपड्यांना दोषी धरतो. कधी तुझ्या वागण्याला दोषी धरतो. पोरीच्या जातीन सांभाळून रहाव असा सल्ला देताना पोराच्या जातीन मुक्तपणे उधळाव पिसाळलेल्या कुत्र्यासारखं कोणालाही चावत सुटाव, असच तर सांगत नसतो न आम्ही. कधी आम्ही टी. व्ही ला दोष देतो. तर कधी चित्रपटांना त्यामुळेच बिघडलय हे सगळं, अस सांगत आम्ही आमचे हात झटकून टाकतो. दुसरं करू तरी काय शकतो आम्ही अजून. म्हणूनच म्हणतो बाई तुच समजून घे आम्हाला आणि
माफ कर ग आम्हाला!
आम्ही पुरूष आहोत. तू स्वतंत्र, तू मुक्त, तू अधिकारिणी हे आम्हाला सहनच होत नाही. तू जरा उंच गेलीस की आम्हाला फार उडायला लागलीय असंवाटतं. तू अधिकारी झालीस की फार शहाणी लागून गेली का असं वाटतं. तू राजकारणात गेलीस की आमच्या हुकूमावर तू चालावं असं वाटत. सौ. सरपंच पेक्षा सरपंच पती अधीक मोठा होतो. आम्ही तुला दाबायचा प्रयत्न करतो नाही जमलं तर अडवतो, बडवतो किंवा सडवतो. मानसिकताच झालीय आमची तशी. आता तू राजकारणात सुरक्षीत नाहीस की पोलीसांच्या रक्षणात आता तू डॉक्टरकडे सुरक्षीत नाहीस आणि स्वतःच्या घरात सुध्दा कारण आम्ही उरलोय फक्त फक्त नर म्हणून आणि तुला समजतोय फक्त मादी उपभोगाची वस्तू म्हणून
माफ कर ग आम्हाला!


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.