
गंगाखेड : शेतक-यांच्या नावे कोट्यवधींचे परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी जवळपास वर्षभरापासून अटकेत असलेले गंगाखेडचे आ.रत्नाकर गुट्टे यांना 5 मार्च रोजी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शेतक-यांची परस्पर फसवणूक केल्याप्रकरणी 5 जुलै 2017 रोजी गंगाखेड शुगर अँण्ड एनजी प्रा.लि.चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्यासह इतर कर्मचा-यांविरूध्द गंगाखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
26 मार्च 2019 रोजी गंगाखेड येथील न्यायालयात दोषारोपत्र दाखल करताना चेअरमन रत्नाकर गुट्टे व लेखापाल दत्तायत्र गायकवाड यांना अटक केली होती. त्यानंतर गेल्या वर्षापासून ते परभणी व औरंगाबाद येथील कारागृहात होते. जामीनासाठी वारंवार अर्ज दाखल करूनही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
त्यानंतर कारागृहात असतानाच 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढविली आणि विजयी झाले.त्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.त्यानंतर आ.गुट्टे यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात अँड.कपिल सिब्बल यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला.अँड. सिब्बल यांनी आ.गुट्टे यांची न्यायालयात बाजू मांडली त्यानंतर त्यांना 5 मार्च ऱोजी जामीन मंजूर झाला. यामुळे, आ.गुट्टे समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.