सुमित दंडुके/औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबादचे भद्रा मारुती मंदिर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने आजपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या नियमावलीनुसार नियमांचे पालन करुन येणाऱ्या भाविकांनाच याठिकाणी दर्शन मिळणार आहे.
अंशत: लॉकडाउन जाहीर झाल्यापासुन जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. तेव्हा वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबादचे भद्रा मारुती मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. परंतू गेल्या काही दिवसांपासून नागरीकांमध्ये या कठोर निर्बंधाबाबत नाराजी आहे. हे मंदिरे दर्शनासाठी सुरु करावी अशी मागणी अनेकांनी केली होती. तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही मंदिरे उघडली नाहीतर आंदोलन करु असा इशारा दिला होता. या दोन्ही मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या आणि होणारी गर्दी याचे योग्य नियाजन लावून प्रत्येक तासाला गर्दी न होता कोरोनाचे नियम पाळुन किती भाविक दर्शन घेतील याचे नियोजन लेखी स्वरुपात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार देवस्थान समितीने नियोजनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. यानंतर घृष्णेश्वर मंदिर आणि भद्रा मारुती मंदिर कोरोनाचे नियम पाळुन आजपासून दर्शनासाठी खुले करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मंदिराचे विश्वस्त शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महापुजा व अभिषेक करुन मंदिर उघडण्यात आले.